शेजारील राज्यातील निर्बंधाचाही परिणाम : पर्यटकांना पडला कोरोनाचा विसर
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात नवीन वर्ष 2021 च्या स्वागताची जय्यत तयारी झाली असून त्याचे संदेश देशभरात सर्वत्र गेल्यामुळे पर्यटकांनी गोव्याकडे धाव घेऊन नववर्ष स्वागतासाठी गोव्याला पसंती दिली आहे. कोरोनाचे संकट विसरून मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी रात्रीच्या पाटर्य़ांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट नको म्हणून बहुतांश पर्यटक आपापली वाहने घेऊनच गोव्यात आले असून राज्यात नवीन वर्ष 2021 चे स्वागत धुमधडाक्यात होणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत नवीन वर्षाबाबत सर्वत्र सामसुम होती. परंतु मागील 10 ते 12 दिवसात या परिस्थितीत बदल झाला असून महाराष्ट्र, कर्नाटकात ‘नाईट कर्फ्यू’ तसेच कोरोनाबाबतच्या नियम व अटींची कटकट असल्याने तेथील पर्यटकांनी नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणे पसंत केले आहे.
कोरोना मार्गदर्शक तत्वांचा फज्ज
नवीन वर्षाचा धुमधडाका व गोव्यातील वाढलेले पर्यटक यांची कोणतीही भीती राज्य सरकारने तसेच पर्यटकांनी बाळगलेली दिसत नाही. अनेक पर्यटक मास्क शिवाय फिरताना दिसत आहेत. सामाजिक अंतर पाळणे पर्यटकांना या गर्दीत शक्य होणार नाही. समुद्रकिनारी तर सॅनिटायझरचा वापर होणे तसे कठीण आहे. पर्यटकांनी स्वतःहून सॅनिटायझर आणले तरच त्यांना त्याचा वापर करता येणार आहे.
कोणतीही एसओपी नाही
रात्रीच्या पाटर्य़ांमध्ये कोरोनाबाबतची कोणतीही एसओपी नसल्याने तेथेही सेनिटायझर व सामाजिक अंतर या नियमांचे पालन होण्याची शक्यता नाही. गेल्या काही दिवसात पॅसिनो तसेच हॉटेलमध्ये नव वर्षाच्या स्वागतासाठी ‘नाईट पार्टी’ चे आयोजन करण्यात आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला जात आहे.
शेजारील राज्यातील निर्बंधांचा परिणाम
महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर अनेक राज्यात नववर्ष स्वागतासाठी रात्रीच्या पाटर्य़ांवर निर्बंध आल्यामुळे तेथील हौशी पर्यटकांच्या उत्सावावर विरजण पडले असून गोव्यात तशा प्रकारचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्या पर्यटकांनी गोव्यात येणे पसंत केले आहे. नवीन वर्षाला जोडून शनिवार, रविवार असा ‘विक एंड’ आल्यामुळे पर्यटकांना जीवाचा गोवा करणे आणखी सोयीस्कर झाले आहे.
राज्यातील सर्व लहान-मोठी हॉटेल्स ‘फुल्ल’
राज्यातील सर्व लहान-मोठी हॉटेल्स ‘फुल्ल’ झाली असून प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. समुद्रकिनारे तर पर्यटकांनी फुलून गेले असून कोरोनाचे कोणतेही नामोनिशाण या पर्यटकांच्या गर्दीतून दिसून येत नाही. पर्यटकांनी कोरोनाची भीती सोडून दिल्याचे दिसून येत आहे.









