प्रतिनिधी/ रत्नागिरी
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्कने गोव्यातून होणाऱया बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक रोखण्यासाठी ‘करडी नजर’ मुंबई-गोवा महामार्गावर रोखली आहे. या विभागाची 2 पथके रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सीमेवर कायम तैनात करण्यात आली असून चिपळूण, लांजासह सर्व जिह्यात ठिकठिकाणी सदैव गस्तीपथकाची नजर राहणार आहे.
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ात परजिल्हा व लगतच्या गोव्यातून मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर दारूची वाहतूक हेते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ही दारु वाहतूक रोखण्यासाठी सतर्क झाला आहे. थर्टीफर्स्टला ठिकठिकाणी पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येत असते. अशा पार्टीचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकामार्फत जिह्यात विविध ठिकाणी अवैध दारु वाहतूक व विक्रीवर ही कारवाई करण्यात आली. जिह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पुरेसे मुनष्यबळ नसूनही या पथकाने भरीव अशी कामगिरी केली आहे. रत्नागिरी जिह्यात 9 वाईन शॉप, 210 परमिट रुम, 58 देशी दारु दुकान आणि 132 बिअर शॉपी आहेत. यातील 50 दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येऊनही कोरोना काळातील मंदी, भागीदारीचे वाद यामुळे ते सध्या बंद असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हय़ात मद्यसेवनासाठी 90 हजार परवाने प्रदान
दारुचे सेवन करण्यासाठी 25 वर्षांची वयोमर्यादा असून दारुविक्रीच्या दुकानांमध्ये देशी दारुसाठी 3 रुपये व विदेशी दारुसाठी 5 रुपये दराने परवाना उपलब्ध होतो. तसेच ऑनलाईन प्रणालीव्दारे वर्षभर दारुचे सेवन करण्यासाठी 100 रुपये आणि आजीवन दारुचे सेवन करण्यासाठी 1 हजार रुपये भरुन परवाने दिले जातात. रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन विभागाने आतापर्यंत 90 हजार परवाने दारुविक्रीच्या दुकानांमध्ये देण्यात आले आहेत.
9 महिन्यात साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त, 583 संशयित अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्य़ात कोरोना काळात एप्रिल 2021 ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत केलेल्या कारवाईतून सुमारे 3 कोटी 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अनेक ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करताना या विभागाने केलेल्या कारवाईत 583 संशयितांना अटक करण्यात आली तर 13 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.









