वाई : भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे मागील 25 महिन्यांपासून वेतन थकले आहे. या थकीत वेतनासाठी जवळपास 400 कामगारांनी आज कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले.
भुईंज येथील हा कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या २५ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. आज अखेर किसनवीर सहकारी कारखान्याच्या कामगारांच्या सहनशीलतेचा बांध फुटला , शेकडो कामगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे शिंग फुंगले, एवढे दिवस मनामध्ये खदखदत असलेल्या भावना जगासमोर आल्या. कारखाना सुरू व्हावा या आशेवर गेली २५ महिने बिनपगारी काम करणाऱ्या कामगारांनी आता कारखाना सुरू होण्याची शक्यता धुसूर झाल्याची दिसताच आंदोलन छेडले..
यावेळी कामगारांनी सांगितले की, कामगार हा भुमिपुत्र सुद्धा आहे. अनेकांच्या वाडवडिलांनी आपली जमिन आपला घाम गाळुन हा कारखाना उभा केला. आज फक्त कारखाना म्हणुन ते ईथे काम करत नव्हते तर त्यांच्यासाठी हे वाडवडिलांनी कष्टाने उभ केलेलं एक मंदिर होतं. हे मंदिर टिकावं म्हणुन ही मंडळी बिनापगारी ऐवढे दिवस काम करत होते. परंतु शेवटी व्यवस्थापनाच्या अपयशामुळे आज त्यांना मनावर दगड ठेवुन रस्त्यावर उतरावं लागलं आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मदन भाेसले आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे आम्हांला माहिती आहे. परंतु आमची सहनशिलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमाेर आंदाेलन छेडावे लागले आहे.