प्रतिनिधी / करमाळा
थकीत वीजबिलामुळे विद्युतपुरवठा खंङीत करण्याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. दिवाळीपूर्वी काही भागात वीजपुरवठा फक्त दोन तास केला जात होता. यामुळे सर्वच पक्षांनी विरोध केला होता. सोलापूरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा चांगलाच मुद्दा गाजला होता. त्यानंतर काही प्रमाणत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, या स्थितीत आमदार संजयमामा शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
करमाळा तालुक्यात फिसरे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार शिंदे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी केली आहे. आमच्यामुळे संपुर्ण राज्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दिवाळीमध्ये शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित झाला नाही.
यापुढे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना वीज बिल हे भरावेच लागणार आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांना सवलत द्यावी अशा सूचना केल्या आहेत. विद्युत मंडळापुढेही अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी वीज बिल भरणे आवश्यक आहे. वीज बिल वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना आधी सूचना दयावी, त्यानंतरच वीजपुरवठा खंडित करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. आमदार शिंदे म्हणाले, यापुढे वीज बिल वसुलीसाठी कोणताही डीपी (ट्रान्सफार्म) बंद करु नका अशा सूचना दिल्या आहेत. डीपी बंद केल्याने जे शेतकरी वीज बिल भारतात त्यांचाही विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यातून बीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्याचे नुकसान होते, असे त म्हणाले.









