थकीत प्रोत्साहन धन तातडीने द्या, अन्यथा काम बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
आशा कार्यकर्त्यांना गेल्या 15 महिन्यांपासून प्रोत्साहन धन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आशा कार्यकर्त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून यापुढे आम्ही काम बंद करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला.
आशा कार्यकर्त्या आरोग्य सेवा विभागातील सर्व कामे करत असतात, घरोघरी जात सर्व नोंदी करतात, जनतेला औषधे देणे याचबरोबर त्यांची नोंद करुन घेणे ही सर्व कामे करत असतात. इतर सरकारी कामांचा सर्व्हे करण्यामध्येही त्या पुढे असतात. पोलीओ डोस किंवा इतर लसीकरण मोहिमेमध्ये त्या काम करतात. मात्र गेल्या 15 महिन्यांपासून वेतनच दिले नाही. त्यामुळे आम्हाला जीवन जगणे कठीण झाले असून आता यापुढे आम्ही कामच करणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
सरकारी कोणत्याही योजना आल्या तर आशा कार्यकर्त्यांना त्या कामासाठी जुंपले जाते. आरोग्य संदर्भातील, मतदान संदर्भातील याचबरोबर ग्रामसभा, जनजागृती ही सर्व कामे त्या करत असतात. गर्भवती महिलांना औषधे, पौष्टिक आहार पुरविणे, लहान मुलांच्या आरोग्याच्या काळजीबरोबरच त्यांना पौष्टिक आहार देणे ही सर्व कामे आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच केली जात आहेत. मात्र वेतन देताना टाळाटाळ केली जाते, हे योग्य आहे काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा काम बंद करु, असे सुनावण्यात आले.
यावेळी कर्नाटक राज्य आशा कार्यकर्ता संघ आणि ऑल इंडिया युनीयनटेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जडगण्णावर, गीता रायगोळ, भारती माशाळ, लता जाधव, सुजाता कुंभार, शैला चिकोडी, जयश्री न्हावी, रुपा अंगडी, सुजाता कालमठ, गंगव्वा बैलहोंगल, सरोजा अंगडी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.









