प्रतिनिधी / सातारा :
आशा व गटप्रवर्तक यांचे राज्य व केंद्र सरकार यांच्याकडून मिळणारे मानधन मागील 5 महिन्यांपासून दिलेले नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात सोमवारी सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. तसेच 31 ऑक्टोंबरपर्यंत थकित वेतन देण्यात यावे, अशी मागणी ही करण्यात आली.
याआंदोलनाअंतर्गत आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य सेवेत सामावून कायम कर्मचारी करण्यात यावे, कायम कर्मचारी होईपर्यंत 18 ते 22 हजार रूपये मानधन देण्यात यावे, एप्रिल पासुनचे सर्व वेतन त्वरीत मंजुर करावे, सांगली जिल्हय़ाप्रमाणे आम्हालाही ग्रामपंचायतींकडून कोरोना सर्व्हेसाठी एप्रिल 2020 पासूनचे 1000 रूपये प्रमाणे मानधन मिळावे, आरोग्य विमा कवच देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी चित्रा झिरचे, रूपाली पवार, कौसल्या साबळे, छाया कदम, रंजना कुके, सविता कांबळे, विद्या शिंदे आदी आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.