शेतकऱयांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी थकित ऊस बिले द्यावीत, याचबरोबर 2021 मधील गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. तेव्हा किमान 3 हजार रुपये प्रतिटन दर सरकारने जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. थकित बिलासंदर्भात 8 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहे.
जिल्हय़ातील साखर कारखाने एफआयआरपीप्रमाणे ऊस बिल देण्यास तयार नाहीत. 2019-20 मधील कोटय़वधी रुपये अनेक साखर कारखान्यांकडे बाकी आहेत. मात्र ती बाकी देण्यास साखर कारखानदार तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा तातडीने ही बिले द्यावीत, यासाठी संबंधित साखर कारखान्यांना सूचना करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
ऊस बिलासाठी तसेच यावषीचा ऊसदर जाहीर करण्याबाबत जिल्हय़ातील सर्व साखर कारखान्यांना शनिवारी शेतकरी निवेदन देणार आहेत. प्रत्येक साखर कारखान्याला जाऊन ही निवेदने दिली जाणार आहेत, असेही यावेळी शेतकऱयांनी सांगितले. खासदार इराण्णा कडाडी यांची भेट घेऊन यावेळी शेतकऱयांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. राज्य रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक, बबन मालाई, भवानी मालाई यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









