मडगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिलेली माहिती, आदेश जारी
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने मोठय़ा प्रमाणात थकबाकीची तातडीने वसुली करण्यासाठी आज शनिवारी सुट्टीच्या दिवशी एक विशेष वसुली मोहीम राबविण्याचे ठरविले असल्याची माहिती मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली. सकाळी 10 ते दुपारपर्यंत ही विशेष विकेंड ड्राइव्ह राबविली जाईल. जरी हा दुसरा शनिवार असला, तरी करदात्यांना परतफेड करण्याची संधी मिळावी यासाठी अतिरिक्त प्रयत्न म्हणून कर, तांत्रिक, लेखा, वसुली, स्वच्छता आणि नगरपालिका ग्रंथालय विभागांना शनिवारी वरील तासांमध्ये उपस्थित राहण्याचा विशेष आदेश जारी करण्यात आला आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱयांनी लवकरात लवकर थकबाकी वसुलीचे प्रयत्न चालविले असून पालिकेच्या कर्मचाऱयांना देखील निर्देश दिले गेले आहेत की, या विशेष मोहिमेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना देखील या विशेष मोहिमेत सक्रिय भाग घेण्याची विनंती केली गेली आहे, जेणेकरून पालिकेला योग्य प्रकारे वसुली करण्यात मदत होईल.
मडगाव पालिकेच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱयांना तत्काळ सफाई करून आणि कचरा उचल करून पालिकेकडून दर्जेदार सेवा देण्यात येते. मात्र हे खूप दुर्दैवी आहे की, व्यावसायिकांनी अजूनही मोठय़ा प्रमाणात थकबाकी भरलेली नाही. जेव्हा पालिका जन्मदाखला ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत सारे काही नागरिकांना सुलभपणे प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न करत असते तेव्हा वार्षिक कर भरण्याच्या वेळी पालिकेला सापत्नभावाची वागणूक का दिली जाते, अशी खंत मुख्याधिकाऱयांनी बोलून दाखविली आहे.
शुक्रवारी एकाच दिवसात 21 लाखांची वसुली
शनिवार व रविवारच्या विशेष मोहिमेनंतर पालिका थकबाकी वसूल करण्याच्या धोरणाचा आढावा घेईल. ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांना ती फेडण्याची विशेष विनंती करण्यात आली आहे. पालिकेने गेल्या आठवडय़ात दुकाने आणि इतरांना सावध करण्यासाठी विशेष पथके पाठवली होती. जर ते थकबाकी भरण्यात अपयशी ठरले, तर पालिका कोणताही विलंब न करता कर चुकविणाऱयांना नोटिसा पाठवून कारवाई करेल, असा इशारा मुख्याधिकाऱयांनी आधीच दिला आहे. 10 हजार रु. व त्याहून जास्त थकबाकी असलेल्यांना आजपासून नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकाच दिवशी 21 लाखांची वसुली केल्याची माहिती मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी दिली.









