रेशनवरील धान्यापासून राहताहेत वंचित : ज्येष्ठ नागरिकांना सहकार्याची गरज
मालवण:
‘थंब’च्या समस्येमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची सध्या शासकीय रेशन दुकानांवर परवड होताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या थंबला ई-पॉस मशीनकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागत आहे. परंतु अशा ‘थंबग्रस्त’ ज्येष्ठ नागरिकांना धान्य वितरणासाठी त्याच रेशन दुकानाशी संबंधित लाभार्थी ‘नॉमिनी’ म्हणून दिला शकतो. या पर्यायाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोना टाळेबंदीच्या काळात सर्वांनाच विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. ज्येष्ठ नागरिकही याला अपवाद नाहीत. सध्या कित्येक ज्येष्ठ नागरिकांना रेशन धान्य दुकानावर थंबची समस्या भेडसावत आहे. थंब स्वीकारला जात नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागते आहे. आपले म्हणणे घेऊन ते सेवाभावी संस्थांमध्ये जाऊन आपली गाऱहाणे मांडत आहेत. या संदर्भात मालवण तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता, ज्यांना थंबची समस्या जाणवत आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्या शिधापत्रिकेवर अन्य कुणी नातेवाईक नसल्यास ते धान्य वितरणसाठी आपला नॉमिनी संबंधित दुकानावर नोंदवू शकतात. मात्र, सदरील व्यक्ती त्याच दुकानातील ग्राहक असावा. त्याचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक व रेशनकार्ड याबाबतची कागदपत्रे सादर करत आवश्यक प्रशासकीय पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यक्ती त्या ज्येष्ठ नागरिकांचे धान्य खरेदी करून ते त्यांना देऊ शकतात. या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. मालवणात आतार्यंत वृद्ध, दिव्यांग व आजारी आदी प्रवर्गातील जवळपास 300 जणांना नॉमिनी पर्यायाचा लाभ देण्यात आला आहे. थंबाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांनीही या पर्यायाचा अवलंब करावा, असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
‘थंब’ग्रस्तांना सहकार्याची गरज
काही ज्येष्ठ नागरिकांना आपले नॉमिनी मिळवतानाही वयोमानामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईक हयात नसतील किंवा गावात वास्तव्यास नसतील अशांना स्थानिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक ज्या रेशन दुकानाचे ग्राहक आहेत, त्या दुकानावरील अन्य एखाद्या ग्राहकाने याकामी पुढाकार घेतला तर त्यांना मोठा आधार मिळू शकतो. बरेच ग्राहक अशाप्रकारे सहकार्य करीत आहेतच. परंतु थंबच्या समस्येमुळे परवड होत असलेल्या ज्येष्ठांची जबाबदारी घेण्यासाठीही अन्य ग्राहकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.









