भारतीय-अमेरिकन डॉक्टरांचा भारताला इशारा : प्रारंभिक टप्प्यातच निदान अन् आरोग्यशिक्षण आवश्यक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कर्करोगावरच्या रुग्णांवर यशस्वी उपचार तसेच या जीवघेण्या आजारासंबंधी स्वतःच्या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधनामुळे जगभरात प्रख्यात भारतीय वंशाच्या 2 अमेरिकन डॉक्टर्सनी भारतासंबंधी इशारा दिला आहे. त्वरित पावले उचलण्यात न आल्यास भारत लवकरच ‘कर्करोगाच्या त्सुनामी’त सापडणार असल्याचा इशारा डॉक्टर दत्तात्रेयुडू नोरी आणि रेखा भंडारी यांनी दिला आहे.
प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉक्टर नोरी यांनी या घातक आजाराने ग्रस्त अनेक दिग्गज भारतीय नेत्यांवर उपचार केले असून यात माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचाही समावेश आहे. डॉक्टर रेखा भंडारी वेदनाशामक औषधांच्या क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखल्या जातात. आरोग्यशिक्षण आणि आजाराच्या प्राथमिक टप्प्यातच त्याचे निदान करण्याच्या जबरदस्त प्रयत्नांद्वारेच भारताला ‘कर्करोगाच्या त्सुनामी’त सापडण्यापासून वाचविले जाऊ शकते, असे दोन्ही डॉक्टर्सनी म्हटले आहे. पुरेशी आणि योग्य पावले उचलली न गेल्यास आमची जन्मभूमी असलेला देश या भीषण रोगाच्या त्सुनामीत सापडू शकतो. भारतात प्रतिदिनी कर्करोगामुळे 1300 जणांचा मृत्यू होत आहे. भारतात दरवर्षी कर्करोगाचे सुमारे 12 लाख नवे रुग्ण समोर येत आहेत. ही स्थिती अर्ली डिटेक्शनचे अत्यल्प प्रमाण आणि खराब उपचारांवर प्रकाश टाकत असल्याचे डॉक्टर नोरी यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्क येथील भारतीय डॉक्टर नोरी यांनी अनेक भारतीय नेत्यांवर यशस्वी उपचार केले आहेत, पण ते प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणे पसंत करतात. कर्करोगामुळे भारतीयांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. हा आजार पीडित कुटुंबाला गरिबीच्या दरीत लोटतो आणि सामाजिक असमानतेला बळ देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारत सरकारला शिफारसी
दोन्ही डॉक्टर्सना अमेरिकेत स्थलांतरितांना दिला जाणारा सर्वात मोठा नागरी पुरस्कार एलिस आयलँड मेडल ऑफ ऑनरने गौरविण्यात आले आहे. दोन्ही डॉक्टर्स भारतात कर्करोगाच्या आव्हानाला तोंड देण्याच्या दिशेने काम करत आहेत. डॉक्टर नोरी यांनी याकरता केंद्र सरकारला अनेक शिफारसी केल्या आहेत. तर डॉक्टर भंडारी या प्रारंभिक अवस्थेतच रोगाच्या निदानासाठी ब्लॉक चेन, कृत्रिम बुद्धिमता यासारख्या नव्या आयटी साधनांवर काम करत आहेत. भारतातील कर्करोगाच्या वाढत्या रुग्णांमागे तंबाखू मुख्य कारण आहे. दोन्ही डॉक्टर्सनी सरकारला कर्करोग हॉटलाईन प्रादेशिक कर्करोग केंद्र तसेच कृतिदल स्थापन करण्याच्या शिफारसी केल्या आहेत.
आयुष्मान भारतचे कौतुक
2015 मध्ये पद्मश्रीने सन्मानित डॉक्टर नोरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आयुष्मान भारत’ योजना आणि नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रमामुळे प्रभावित झाले आहेत. कर्करोग रोखण्याच्या दिशेने उचलण्यात आलेली ही योग्य अन् महत्त्वाची पावले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कर्करोगाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी जलद निदान आणि आरोग्यशिक्षणाचा वेगाने प्रसार होण्याची गरज असल्याचे नोरी आणि भंडारी यांनी म्हटले आहे.
आरोग्यसेवेसमोर आव्हान
2030 पर्यंत भारतात दरवर्षी कर्करोगाचे सुमारे 17 लाख नवे रुग्ण समोर येतील, असा इशारा इंटरनॅशनल एजेन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने दिला आहे. भारतात कुटुंबातील एखाद्या सदस्याला कर्करोगाची लागण झाल्यास पूर्ण कुटुंबच दारिद्रय़रेषेखाली सापडते, असे म्हणत नोरी यांनी भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेसमोरील हे मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे.









