मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा दावा
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यानी राज्यात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत काँग्रेस पक्ष किंगमेकर ठरणार आहे. अशा स्थितीत समाजवादी पक्ष सत्तेवर येऊ शकतो. मतदार योगी आदित्यनाथ यांना सत्तेतून बाहेर काढणार असल्याचे बघेल म्हणाले.
उत्तरप्रदेश निवडणुकीत यंदा मुख्य लढत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षादरम्यान झाल्याचे मानले जाते. परंतु मायावतींचा बसप आणि काँग्रेस त्रिशंकू विधानसभा निर्माण झाल्यास सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व प्रियंका वड्रा करत आहेत.
आगामी निकाल सर्वांना चकित करणार आहे. काँग्रेस पक्ष 1996 नंतर पहिल्यांदाच 400 जागांवर निवडणूक लढत आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने विकास आणि कल्याण, महिला सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला होता. तर अन्य राजकीय पक्षांनी जाती आणि धर्माचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता असा दावा बघेल यांनी केला आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात मोठी मेहनत केली आहे. काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये मोठय़ा संख्येत तरुण-तरुणी आणि महिलांचा सहभाग होता. यातून आम्ही उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे निदर्शनास येते असा दावा त्यांनी केला आहे.









