हिपेटायटिस सी अर्थात काविळीवरील विषाणूच्या संशोधनासाठी यंदाचा ‘नोबेल पुरस्कार’ अमेरिकेतील हार्वे जे. आल्टर, चार्ल्स एम. राईस आणि इंग्लंडमधील मायकल हाउटन यांना जाहीर होणे, हा त्रिरत्नांचाच सन्मान म्हणायला हवा. स्वीडिश संशोधक आल्प्रेड नोबेल यांनी 124 वर्षांपूर्वी दिलेल्या देणगीतून दिला जाणारा ‘नोबेल’ हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता व साहित्य अशा विविध क्षेत्रांसाठी हा सन्मान दिला जातो. त्यानुसार वैद्यकीय व औषधशास्त्र क्षेत्राकरिता या तीन शास्त्रज्ञांची झालेली निवड सर्वार्थाने महत्त्वपूर्ण ठरते. हिपेटायटिस वा काविळ हा आजार जितका सरळ तितकाच गुंतागुंतीचा मानतात. ही गुंतागुंत सोडविण्यात या तीन तपस्वींनी दिलेल्या योगदानातूनच त्यांच्या कार्याचे मोल ध्यानात यावे. हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज अर्थात काविळ होय. त्यामागे विषाणू संसर्ग, अतिरेकी मद्यपान, पाणी वा अन्नातून झालेली विषबाधा यासारखी अनेक कारणे आहेत. साधारण आठ दशकांपूर्वी हिपेटायटिसचे ए व बी हे प्रकार समोर आले. दूषित अन्न पाण्यातून होणाऱया हिपेटायटिस एचे शरीरावरील दुष्परिणाम तात्कालिक असल्याने हा आजार सर्वसाधारण मानतात तर विषाणूमुळे वा संसर्गित व्यक्तीच्या रक्तातून संक्रमित होणारा हिपेटायटिस बी जीवघेणा म्हणून ओळखला जातो. 1960 च्या दशकात अमेरिकन शास्त्रज्ञ बरूच ब्लूमबर्ग यांनी त्याविषयीचे संशोधन केल्याने त्यावर लस तयार करणे शक्य झाले. त्याबद्दल ब्लूमबर्ग यांना 1976 चे नोबेल पारितोषिकही प्राप्त झाले होते. ए व बीपेक्षा हिपेटायटिस सीचा विषाणू भिन्न असून, त्याचे हे अस्तित्व सिद्ध करण्याचे मूलभूत संशोधन आल्टर यांनी केले आहे. हाउटन यांनी हिपेटायटिसने संसर्गित रुग्णांच्या रक्तातील प्रतिपिंडे वापरून विषाणूचा जनुकीय आराखडा तपासला. या नव्या प्रयोगामुळे हिपेटायटिस सीची चाचणी करणे आवाक्यात आले. स्वाभाविकच रक्तातून या रोगाच्या होणाऱया संक्रमणाचे प्रमाण घटून लाखोंचे प्राण वाचले. दुसऱया बाजूला राइस यांनी माणसांप्रमाणे चिंपांझीवरही हा विषाणू संसर्ग करीत असून, त्यातून यकृतावरही परिणाम होत असल्याचे दाखवून दिले. म्हणूनच विषाणूविरोधी औषध निर्माण करणे शक्य होऊ शकले. या तिन्ही शास्त्रज्ञांचे हे परस्परपूरक संशोधन पाहता ते या पुरस्कारास निश्चितपणे पात्र ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी या आजाराचे सात कोटी रुग्ण आढळून येतात तर 4 लाख रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. या विषाणूच्या तीव्रतेतूनच लिव्हर सिरोसिस वा कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण मिळत असून, त्यातून अनेकांचे बळी जात असल्याचे ही आकडेवारी सांगते. भारतासारख्या देशात चार कोटी रुग्ण हिपेटायटिस बीचे, तर जवळपास पाऊण लाख ते एक कोटीपर्यंत हिपेटायटिस सीचे रुग्ण आढळून येतात. हे पाहता आपल्या देशासाठी यकृतदाह हे एक आव्हानच मानता येईल. मुळात याबाबत लोकांमध्ये म्हणावी तशी जागृती दिसून येत नाही. तसेच यावरील उपचार हे अत्यंत महागडय़ा स्वरुपाचे असून, ते सर्वसामान्यांच्या अजिबात आवाक्यातील नाहीत. किंबहुना, हिपेटायटिसवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेला कार्यक्रम प्रशंसनीय म्हणता येईल. 2030 पर्यंत हिपेटायटिस निर्मूलनाचे लक्ष्य असून, ते 2025 पर्यंतच पूर्ण करण्याचा आरोग्य मंत्रालयाचा मानस आहे. आपल्याकडे जन्मानंतर लगेचच बाळाला हिपेटायटिस बीची लस देण्यात येते. त्यानंतर पुढील डोस देण्यात येतात. ही लस बालकांसाठी अत्यावश्यक असून, त्याबाबत अधिकाधिक जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. हिपेटायटिस सीसंदर्भात अद्याप लस उपलब्ध नाही. परंतु, यावरील गुंतागुंतीची होणारी उकल पाहता या आघाडीवरही भविष्यात वैद्यक क्षेत्राकडून ठोस पावले पडू शकतील, यात कोणताही संदेह वाटत नाही. कोरोनाने आज आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित केले आहे. सगळय़ा जगाला कोविड 19 ने ग्रासले असून, भारतासारख्या देशाची रुग्णसंख्या 66 लाखांवर पोचली आहे. तर बळींनीही आता लाखाचा आकडा पार केला आहे. दैनंदिन मानवी जीवन, अर्थव्यवस्थेपासून सगळय़ाच घटकांवर या विषाणूने जबरदस्त प्रहार केल्याने जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळित झाल्याचे पहायला मिळते. आणखी किती दिवस यात जाणार, साथ कुठवर चालणार, हा आजघडीला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य लशीकडे सगळय़ा जगाचे लक्ष लागले आहे. अनेक देश व वैद्यकीय संस्थांमधील लशी नजरेच्या टप्प्यात असल्या, तरी त्यासाठी आणखी काही काळ जाईल, हे सांगता येत नाही. स्वाभाविकच कोरोनाने मानवी जीवनाला दिलेला धक्का बघता आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने सर्वांनाच अधिक प्रयत्न करावे लागतील, हे निश्चित. प्लेग, देवी, स्वाईन फ्लूसारख्या कितीतरी साथी, नारू, पोलिओसारखे आजार आपण झेलले. त्यावर मात केली. हृदयरोग, कर्करोगासह अन्य आजारांवरील उपचार पद्धतीतही क्रांतिकारक सुधारणा झाल्या आहेत. त्यातून माणसाचे आयुर्मान नक्कीच वाढले. परंतु, विविध रोगांमधील वाढते गुंते, नवनवीन आजार, साथींचे संक्रमण ध्यानात घेता या स्तरावर आणखी बरेच काम करावे लागेल. कोरोना काळात उपचाराबरोबर सर्वाधिक कमतरता जाणवली, ती डॉक्टरांची. हे लक्षात घेतल्यास नव्या पिढीने या क्षेत्रात येण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. अमेरिका, युरोपमध्ये संशोधनाकडे गांभिर्याने पाहिले जाते. नोबेल विजेत्यांची नामावली पाहिल्यास प्रामुख्याने तेथीलच नावे दृष्टीस पडतात. भारतासारख्या देशात गुणवत्तेची व कल्पकतेची कमी नसली, तरी संशोधन वृत्ती वा प्रयोगशील दृष्टीकोन वाढीस लागण्यासाठी आपल्याला मुळापासून लक्ष द्यावे लागेल. माणूस आणि विषाणू हा संघर्ष अनादी, अनंत आहे. जोवर जीवसृष्टी आहे, तोवर हा संघर्ष अटळ असेल. म्हणूनच विषाणूंच्या शत्रूसंगे लढण्यासाठी या त्रिमूर्तींप्रमाणे जुन्या-नव्या पिढीतील सर्व अभ्यासकांना संशोधन, चिकाटी व प्रयोगशीलतेची त्रिसूत्री अवलंबावीच लागेल.
Next Article पंचायत इमारतींतील गाळे वितरणासाठी समिती स्थापन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








