तरुण भारतच्या वृत्ताची अधीक्षक अभियंत्यांकडून दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉम कर्मचाऱयाने बिलाची रक्कम परस्पर खर्च केल्यामुळे गोंधळ उडाला होता. कर्मचाऱयाने ग्राहकांची फसवणूक केल्याचे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध झाले होते. याची तात्काळ दखल हेस्कॉमच्या अधीक्षक अभियंत्यांनी घेतली आहे. शनिवारी त्यांनी त्या कर्मचाऱयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे तरी असे प्रकार थांबतील अशी आशा ग्राहकांतून व्यक्त केली जात आहे.
महाद्वार रोड येथे हेस्कॉमच्या एका मीटर रिडरने ग्राहकांकडून बिलाची रक्कम वसूल करून ती कार्यालयात न भरता परस्पर वापरली. बील भरूनही ग्राहकांना बील भरण्यास सांगण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. परंतु कार्यालयीन स्तरावर ते मिटविण्यात आल्याने त्याची वाच्यता झाली नाही. त्यामुळेच अशा बेजबाबदार कर्मचाऱयांचे फावत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी तक्रार करणे गरजेचे आहे.
शनिवारी हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. कार्यालयीन कामकाजावर अधिकाऱयांचा वचक नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याची तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकारांमुळे हेस्कॉमची प्रतिमा डागाळत असल्याने कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी करण्यात आली.
बेळगावचे अधीक्षक अभियंता गिरीधर कुलकर्णी यांनी यांनी तरुण भारतमधील वृत्त वाचून असे प्रकार घडणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. संबंधित कर्मचाऱयाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी कर्मचाऱयांना दिला. त्यामुळे बिलाचे पैसे परस्पर वापरणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.









