ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ या निवसस्थानी घुसण्याचा प्रयत्न करणाऱया शेतकऱयाची विचारपूस करुन त्याला सोडून देण्यात यावे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेरवाडी पोलिसांना दिला आहे.
पनवेलचा देशमुख नावाचा कर्जबाजारी शेतकरी आपले गाऱहाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आठ वर्षाच्या मुलीसह आज सकाळी आला होता. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून मातोश्रीबाहेर तो उभा होता. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये सोडण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे देशमुख यांनी थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि देशमुख यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले. देशमुख सध्या खेरवाडी पोलीस ठाण्यात आहेत.
त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या शेतकऱयाला त्याचे काय काम आहे, हे जाणून घ्या आणि त्याला सोडून द्या, असा आदेश पोलिसांना दिला आहे.