जि. प.त खळबळ : संबंधितांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करणार
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हांतर्गत शिक्षकांच्या समुपदेशन बदली प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या शिक्षण विभागातील संबंधित कर्मचाऱयांची पुरती झोप उडाली आहे. 19 कर्मचारी या शिक्षकाच्या संपर्कात आल्याची बाब समोर आली आहे. या कर्मचाऱयांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जाणार असून त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान स्वॅब तपासणीसाठी घेतल्यानंतर आरोग्य विभागाने दिलेले होम क्वारंटाईनचे आदेश धुडकावत संबंधित शिक्षक बदली प्रक्रियेत का सहभागी झाला तसेच शाळेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता वा नोकरीच्या कार्यरत जिल्हय़ात वास्तव्य न करता अन्य जिल्हय़ात ये-जा करीत असल्याच्या घटनेबाबत संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
आंबोली चेकपोस्ट येथे परजिल्हय़ातून येणाऱया व्यक्तींची नोंद करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शिक्षकांचे स्वॅब 8 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी घेण्यात आले होते. या स्वॅबचा अहवाल 10 रोजी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. यातील एक शिक्षक 9 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी झाला होता. त्यामुळे जि. प. कर्मचाऱयांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान या शिक्षकाला स्वॅब घेतल्यानंतर किमानपक्षी त्याचा अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन होण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेने दिले होते. साथरोग प्रतिब्ंाध कायदा लागू असल्याने या आदेशाचे पालन करणे संबंधित शिक्षकाला बंधनकारक होते. मात्र हे आदेश न मानता तो शिक्षक 9 ऑगस्टच्या जिल्हांतर्गत विनंती बदली प्रक्रियेत सहभागी झाला होता. त्यामुळे जि. प. शिक्षण विभागासह जिल्हा आरोग्य यंत्रणा हायरिक्सवर आली आहे.
बदली प्रक्रियेदरम्यान या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचपणी प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 19 कर्मचारी संबंधिताच्या संपर्कात या ना त्या कारणाने आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱयांचे स्वॅब तपासले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान संबंधित शिक्षक जि. प. इमारतीच्या ज्या परिसरात फिरल्याचे कॅमेऱयात दिसून येत आहे, त्यासह या इमारतीचा सर्वच परिसर औषध फवारणीने निर्जंतूक करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.









