प्रतिनिधी / नागठाणे
शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी ( ता.सातारा ) येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला मारहाण करत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चारपैकी दोन वनकर्मचार्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी सायंकाळी उच्च न्यायालयातही फेटाळण्यात आला.तपासणी अधिकारी डॉ. सागर वाघ व सरकारी वकील यांनी उच्च न्यायालयात मांडलेल्या भक्कम बाजुमुळेच येथेही या संशयितांच्या पदरी निराशाच पडली.अर्ज फेटाळणार हे लक्षात आल्यावर संशयितांच्या वकिलांनी जमीन अर्जच मागे काढून घेतला. आता हे चारही संशयित बोरगाव पोलिसांकडे शरणागती पत्करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड ‘तरुण भारत’ ने करून वेळोवेळी या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता.
३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी माकडांपासून पिकांचे रक्षण करावयास गेलेल्या डोंगर पठारावरील पिरेवाडी येथील ओंकार शिंदे या युवकाला वनविभागाचा वनपाल योगेश गावित,वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व किशोर ढाणे या कर्मचाऱ्यांनी मारहाण करीत शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली होती.यावेळी त्याच्याकडून या कंपूने पंचवीस हजार रुपये उकळले होते.या घटनेची फिर्याद ५ सप्टेंबरला बोरगाव पोलिस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी या चारही वनकर्मचार्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून हे चारही कर्मचारी बोरगाव पोलिसांना गुंगारा देत आहेत.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा सत्र न्यायालयात वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले यांनी केलेला अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आला होता.त्यावेळी सरकारी वकिल व तपासी अधिकारी डॉ. सागर वाघ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपली बाजू खंबीरपणे मांडली होती.त्यामुळेच जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.या खंडणी प्रकरणाने मोठ्या वनविभागाची चांगलीच बदनामी झाल्याने वन विभागामार्फत या चारही कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबनही करण्यात आले होते.
आपणाला उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर होऊ शकतो असा समज या संशयितांचा होता.त्यामुळे वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.मात्र येथेही बोरगावचे सपोनि व तपासी अधिकारी डॉ.सागर वाघ व सरकारी वकील गायकवाड यांनी खंबीरपणे बाजू मांडली.त्यासाठी सपोनि वाघ यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची स्पेशल परवानगी घेतली होती. त्यामुळे अखेर बुधवारी उशिरा उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.उच्च न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळल्याचे समजताच संशयिताच्या वकीलावर अटकपूर्व जामीन अर्ज काढून घेण्याची नामुष्की आली.आता या चारही संशयित वनकर्मचार्यांना बोरगाव पोलिसांपुढे शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय राहिला नसून ते कधी बोरगाव पोलिसांच्या स्वाधीन होतात? याकडेच परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे
Previous Articleबेळगाव जिह्यात 20 हजार जणांनी केली कोरोनावर मात
Next Article मुलीच्या डोळय़ादेखत मातेचा मृत्यू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.