विवाहाच्या पहिल्या रात्री तथाकथित कौमार्य चाचणीमध्ये अपयशी ठरल्याच्या कारणावरून दोन सख्ख्या बहिणीना जातपंचायतीसमोर उभे करून घटस्फोट दिल्याची घटना बेळगाव जिह्यात घडली आहे. विशेष म्हणजे त्या दोघींना घटस्फोट देणारे दोघे सख्खे भाऊ असून त्यातील एक सैन्यदलात नोकरीला आहे. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दोन मुलींनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये विवाहाच्या पहिल्याच रात्री त्यांची कौमार्य चाचणी घेण्यात आली. त्यात त्या सफल झाल्या नाहीत असे कारण दाखवून घटस्फोट दिला गेला. यातील एका मुलीला गळफास घेण्यास प्रवृत्त केले जात होते असेही तक्रारीत म्हटले असून दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि ती पूर्ण न केल्याने जबरदस्तीने त्यांना परत पाठवून देण्यात आले असे तक्रारीत म्हटले आहे. आता जातपंचायतीच्या लोकांकडून पोलीस ठाण्यात जाऊ नये, प्रकरण मिटवून घ्यावे आणि मुलींना आपल्याच घरी ठेवून घ्यावे म्हणून मुलींच्या आईवर दबाव आणला जात आहे. हे खूपच गंभीर आहे. ‘तरुण भारत सोशल मीडिया’द्वारे या अन्यायग्रस्त मुलींच्या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने याची गांभीर्याने दखलही घेतली आहे. जातपंचायतीच्या बुरसटलेल्या कौमार्य चाचणीच्या कल्पनेतून एकाच घरातील दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून न्यायासाठी त्यांनी टाहो फोडला हे खूपच महत्त्वाचे आहे. जातपंचायतीने केलेली सक्ती हा अन्याय आहे, अशी तक्रार द्यायला दोन्ही मुली तयार झाल्या ही या प्रकरणात फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी धाडस केले हे खरेच, मात्र त्यांच्या त्या धाडसाला साथ मिळून त्यांच्यावरील अन्याय दूर होणे ही या प्रकरणातील महत्त्वाची गरज आहे. त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हा केवळ त्या दोन मुलींचाच प्रश्न नाही. शेकडो मुलींवर आजपर्यंत अन्याय झाला असेल. मात्र पोलिसात जाण्याचे धाडस केवळ दोन भगिनींनी केले आहे. त्यांना सर्व समाजातून साथ मिळणे गरजेचे आहे. कोल्हापूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या दोन अभागी मुलींना आधार दिला आहे. मात्र बेळगाव आणि कोल्हापूर जिह्यातील सर्वसामान्य कुटुंबांचा या मुलींना आधार मिळाल्याशिवाय आणि या विरोधात सार्वत्रिक आवाज उठवल्याशिवाय हे प्रकरण धसास लागणार नाही. हा केवळ या दोन मुलींचा प्रश्न नसून ज्या समाजामध्ये अशा प्रकारची घातक प्रथा आजही सुरू आहे तिथे परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोठे प्रबोधन हाती घ्यावे लागणार आहे. एकीकडे कायद्याचा धाक आणि दुसरीकडे प्रबोधन अशा दोन मार्गांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. देवदासी प्रथेविरोधात किंवा यात्रांमध्ये दिल्या जाणाऱया पशुबळीच्या प्रथेविरोधात ज्या बेळगाव जिह्यातून मोठय़ा परिवर्तनाला सुरुवात झाली, तिथलेच नवे प्रकरण आधुनिक काळाला काळिमा फासणारे आहे. प्रबोधन कार्य करणाऱया नव्या पिढीतील कार्यकर्त्यांसमोर हे एक मोठे आव्हान उभे आहे. समाज जसजसा विकसित होत चालला आहे तसतसे तिथल्या कुप्रथा बंद होत गेल्या, असा आजवरचा अनुभव. मात्र या नव्या प्रकरणामुळे समाजाच्या पोटात शिरून काम करण्यासाठी अद्यापही चळवळींना मोठी लढाई लढावी लागेल हे स्पष्ट झालेले आहे. प्रगत समाजात आतून बरीच व्यंगे आहेत. ती दूर करण्यासाठी चळवळ गरजेची आहे. कोल्हापूर आणि बेळगाव जिह्यातील शहरी भागात विकासाचे जे पर्व सुरू झाले ते इथल्या सर्वसामान्य माणसांनी स्वतःच्या कष्टाने निर्माण केले. तीच स्थिती ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील लोकांची. इथल्या ग्रामीण जनतेने स्वयंप्रेरणेने विकासचक्रात स्वतःच्या जीवनाला गती देत परिस्थितीत बदल घडवून आणले. त्यासाठी समाजाची वैचारिक मशागत करणारे असंख्य कार्यकर्ते या टापूत गेले शतकभर झटले. त्यातून आजचा समाज हा अधिक विकसित आणि वैचारिकदृष्टय़ा पुढारलेला बनला आहे. मात्र संपूर्ण समाज अशा विचारांचा नाही हे या घटनेने अधोरेखित झाले आहे. एका कुटुंबात एखादी तरुण मुलगी तिचा कोणताही दोष नसताना एका अशास्त्रीय धारणेचा बळी ठरावी हे आजच्या काळासाठी योग्य नाही. मुलींच्या शारीरिक स्थितीतील होणारे बदल आणि त्यांचे कौमार्य या बाबींना अवास्तव महत्त्व देऊन त्यांना नैतिक आणि अनैतिकतेशी जोडून पाहण्याचा काळ हा मागासलेला काळ होता. आज आधुनिक विज्ञानाने या सर्व कल्पना खोटय़ा होत्या हे वारंवार समजावून सांगितलेले आहे. मात्र तरीही कोणत्यातरी आमिषाने किंवा इतर वाईट हेतूने अशाप्रकारे एखाद्या कुटुंबाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हे वाईटच. छोटय़ा, छोटय़ा जाती-जमाती या सीमाभागात मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यातील कुप्रथा नष्ट व्हाव्यात यासाठी त्याच समाजातील साक्षर युवकांकडून कार्य सुरू आहे. मात्र तरीही थोडीफार प्रगती केलेल्या कुटुंबाला नाडून त्यांना अनावश्यक खर्च करायला लावणे, किरकोळ कारणांचे निमित्त करून दंड करणे, प्रसंगी बहिष्कृत करणे आणि पुन्हा जातीत घेण्यासाठी पैसे उकळणे किंवा मोठा खर्च करायला लावून आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करणे असे प्रकार सर्रास घडतात. छोटय़ा जाती असल्यामुळे जातीबाहेर पडणे मुश्कील आणि त्रासदायक असल्याने कोणी तक्रार करत नाहीत. परिणामी मूठभर लोकांचे फावते. अशांना कायद्याचा धाक हवा. सीमाभागातील दोन्ही राज्यात असणाऱया पोलिसांनी त्यासाठी सतर्कता दाखवली पाहिजे. मात्र तक्रार दाखल होत नसल्याने अनेक प्रकरणात निमूटपणे अन्याय सहन केला जातो. कोल्हापूरच्या एकाच कुटुंबातील दोन मुलींनी आवाज उठवल्यानंतर त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणे हे यंत्रणांचे काम ठरते. या प्रकरणात सासरच्या कुटुंबाचे मनपरिवर्तन घडवण्यासाठी प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून दोघींचे संसार सुरळीत झाले पाहिजेत. त्याचा पुढील काळात आढावाही घेत राहिले पाहिजे. तरच याविरोधात उठणाऱया आवाजात जीव निर्माण होऊन अशा घटनेच्या विरोधात ठिकठिकाणी लोक स्वतःहून बोलू लागतील. अशा प्रथा बंद पडतील. त्यासाठी पहिले पाऊल उचलले जाण्याची गरज आहे.
Previous Articleसमानशील, समान संकट असलेल्या लोकांची मैत्री होते
Next Article केकेआर ‘शेर’, मुंबई इंडियन्स ‘सव्वाशेर’!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








