71 व्या वाढदिवसाचे आगळे सेलेब्रेशन, 35 हृदयरोगी मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्च देणार
वृत्तसंस्था/ मुंबई
आपला वाढदिवस अनेक सेलेब्रिटी मोठय़ा थाटामाटात साजरा करताना आपण पाहिले आहे. पण भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी आपला 71 वा वाढदिवस आगळय़ा वेगळय़ा पद्धतीने साजरा करीत नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी खारघर येथील चाईल्ड हार्ट केअर या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमधील 35 मुलांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली असून ते त्यांच्यासाठी ‘भगवान’ ठरले आहेत.
ज्या मातापित्यांना आपल्या मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्च करता येणे शक्य नाही, त्यांच्या मदतीसाठी गावसकर देवासारखे धावून आले आहेत. त्यांनी क्रिकेट कारकिर्दीत एकूण 35 आंतरराष्ट्रीय शतके नोंदवली होती. यासाठी त्यांनी 35 मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे. ‘मदत करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. पण प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यात मुलांचे खास स्थान असते. सर्वचजण त्यांच्या उज्ज्वल भविष्याची व खुशीची इच्छा व्यक्त करीत असतात. पण दुर्दैवाने भारतामधील मुलांना जन्मताच हृदयरोगाशी सामना करावा लागण्याचे प्रमाण अधिक आहे. यातील बहुतांश मुले गरीब असून त्यांची देखभाल करणाऱया संस्थाही मर्यादित आहे. द हार्ट टू हार्ट फौंडेशनसाठी मी काम करीत असून देशातील शेकडो मुलांना जीवनदान देण्याचे कार्य हे फौंडेशन करीत आहे,’ असे गावसकर यांनी या निर्णयामागील प्रेरणेबद्दल सांगितले.
श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चिल्ड्रन हार्ट केअर यांची केंद्रे नया रायपूर, पलवाल, हरियाणा, खारघर, नवी मुंबई येथे असून हृदयरोग पीडित मुलांवर ते मोफत उपचार व शस्त्रक्रिया करतात. ‘ओन्ली दिल, नो बिल’ हे त्यांचे ब्रीद आहे. शस्त्रक्रियेनंतर नवजीवन मिळालेल्या मुलांच्या मातापित्यांच्या चेहऱयावर फुललेला आनंद व कृतज्ञ भाव खूप समाधान देणारे असतात, अशा भावनाही गावसकर यांनी व्यक्त केल्या. त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी 59 लाखाचे दान दिले असून त्यापैकी 35 लाख रुपये पीएम केअर्स फंडामध्ये तर मुंबई संघातर्फे खेळताना त्यांनी 24 शतके झळकवली होती म्हणून 24 लाख रुपये त्यांनी मुख्यमंत्री निधीत दिले आहेत.









