तब्बल एक लाख तीन हजार रुपयांची मदत जमा : मातेकडून ‘तरुण भारत’ व दात्यांचे आभार
‘तरुण भारत’ इफेक्ट
तेजस देसाई / दोडामार्ग:
आपल्या कर्णबधिर मुलाला कानाने ऐकू येण्यासाठी प्रोसेसर आवश्यक होता. त्यासाठी परिस्थितीने खचलेल्या मातेने ‘तरुण भारत’च्या माध्यमातून समाजाला हाक दिली होती. महत्त्वाचे म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात त्या माऊलीच्या झोळीत वाचक व दात्यांनी तब्बल एक लाख तीन हजार रुपयांची मदत जमा केली. त्यामुळे सासोली येथील ठाकुर कुटुंबीय समाधानी झाले असून मदत अन्य गरजूला मिळावी, या उद्देशाने थांबविण्याची विनंती केली आहे.
याबाबतची पार्श्वभूमी अशी की, सासोली येथील प्रणिता ठाकुर यांनी आपल्या आठवीत शिकणाऱया कर्णबधिर मुलांना ऐकू येण्यासाठी मशीन दुरुस्ती (प्रोसेसर) साठी समाजाला पत्र लिहिले होते. या पत्रातील मजकुरासह ‘माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया’ या मथळय़ाखाली ‘तरुण भारत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले. ठाकुर कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. हे वृत्त प्रकाशित झाल्यावर प्रसाद सावंत, सावळो गावकर, रामकृष्ण दळवी, सिद्धेश परमेकर, प्रसाद परमेकर, गिरीश गवस, सुरेंद्र गवस, प्रदीप देसाई, झिलू गवस, विठ्ठल गवस, श्रीकांत जाधव, शिवाजी गवस, संदीप पटकारे, गजानन झोरे, उमेश सावंत, संस्कृती फाउंडेशन मुंबईचे संदीप देसाई, नूतन विद्यालय कळणेचे शिक्षक वर्ग उमेश देसाई, महेंद्र देसाई, प्रशांत राऊळ, सतीश धर्णे, निकिता सावंत, राजश्री देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, येथील भारत माता की जय संघटनेचे बंधू-भगिनी, करण शेटकर, संजय वसावे, प्रमोद गवस, धनश्री गवस, संदेश गवस, श्रीगणेश गावडे, जयवंत आठलेकर, विनिता देसाई, ओंकार फाटक, प्रदीप गावडे, भगवान गवस, समीर ठाकुर गणपत डांगी, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, खासदार विनायक राऊत, राजू भोसले, संगीता देसाई, पराशर सावंत आदींनी ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल घेत ठाकुर कुटुंबियांस धीर दिला. त्यामुळे ठाकुर कुटुंबास आवश्यक 89 हजार रुपयांची मदत पूर्ण होत एक लाख तीन हजार रुपयांपर्यंत मदत जमा झाली.
आई झाली भावूक
नारायणची आई प्रणिता म्हणाल्या, लॉकडाऊनमध्ये रोजगार नसतानाही आपल्या कुटुंबाला मिळालेली मदत ही माणुसकी दाखविणारी आहे. या चळवळीत ‘तरुण भारत’ मला भावाप्रमाणे साथ देणारा वाटला. ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचे माझ्यावर आजन्म ऋण आहेत. याची जाणीव आपणाला राहील, असे सांगत त्या भावूक झाल्या. आता आपल्या मुलाला ऐकू येणार असून आपण धन्य झाले असल्याचे प्रणिता ठाकुर म्हणाल्या.









