प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक संदर्भात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठा बँक, मराठा युवक संघ व मराठा मंदिर अशा संस्थांमध्ये कार्यरत असलेले बाळासाहेब काकतकर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना भेटत आहेत. ते ज्या उमेदवाराला भेटले आहेत त्याचा शहर महाराष्ट्र एकीकरण समितीशी कोणताही प्रकारचा संबंध नसल्याची भुमिका शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहिर केली आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तळमळीने प्रयत्न करीत आहे. मराठी भाषिकांवर होणाऱया अन्यायाला वाचा फोडून न्याय हक्कांसाठी लढत आहेत. मराठी भाषा व अस्मिता सीमाभागात टिकुन रहावी यासाठी शहर समिती कार्यरत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात बाळासाहेब काकतकर यांच्यावर शहर म. ए. समितीच्या वतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रविवारी या संदर्भात बैठक झाली त्यावेळी बाळासाहेब काकतकर यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. बैठकीत उपस्थित शिवाजी हंडे, नारायण किटवाडकर, श्रीकांत देसाई आणि शिवाजी हंगिरगेकर यांनी या भेटीसंदर्भात आपल्याला कोणतीच पूर्वकल्पना नव्हती. उमेदवार निवडीचे अभिनंदन करण्यासाठी जाण्याचा उद्देश माहित नव्हता. मराठा बँक किंवा इतर संस्थांशी संबंधित एखादे काम असावे म्हणून आम्ही गेलो होतो, यामुळे आमचा राजकीय उद्देश नव्हता. आम्ही पूर्वीपासून महाराष्ट्र एकिकरण समितीचे नि÷ावंत असून यापुढेही समितीच्या सर्व निर्णयास बांधिल आहोत, अशी माहिती दिली.
या बैठकीला शहर समितीचे सदस्य सुहास किल्लेकर, नारायण किटवाडकर, शिवाजी हंडे, सचिन केळवेकर, अंकुश केसरकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









