विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
वार्ताहर /अगसगे
जय किसान भाजी मार्केट उभारण्यासाठी गैरमार्गाने परवाना मिळविला आहे. यामुळे भविष्य काळात शेतकऱयांची आर्थिक पिळवणूक होणार आहे. एपीएमसीतील सरकारी भाजी मार्केट टिकविण्यासाठी दि. 14 फेब्रुवारीला होणाऱया अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याकडून खासगी भाजी मार्केट परवाना रद्द करण्याचा सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करणार, असे उद्गार विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी एपीएमसीतील आंदोलनस्थळी काढले.
बुधवार दि. 9 रोजी एपीएमसीतील भाजी दुकानदार व शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांची विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. गेल्या सात दिवसांपासून खासगी भाजीमार्केटचा परवाना रद्द व्हावा म्हणून एपीएमसीसमोर भाजी दुकानदारांचे व शेतकऱयांचे आंदोलन सुरूच आहे.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, सध्याचे सरकार खासगीकरणाला जास्त महत्त्व देत आहे. खासगीकरणामुळे शेतकऱयांना भविष्यात वाईट दिवस येणार असून त्याची आर्थिक पिळवणूक होणार आहे. जय किसान भाजीमार्केट जागेचा एन. ए. लेआऊट करताना आणि परवाना देताना सरकारच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. यामध्ये भ्रष्ट अधिकाऱयांचा हात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांकडून लेखी स्वरुपात उत्तरे मागू. जय किसान भाजी मार्केटमुळे एपीएमसी आणि सरकारचे कोटय़वधी रुपये नुकसान होत आहे. याचा सरकारने देखील विचार करणे गरजेचे आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याकडे ही समस्या मांडतो. या आंदोलनाला यश नक्कीच मिळेल, अशी ग्वाही चन्नराज हट्टीहोळी यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. यामुळे आंदोलनाला दिवसेंदिवस राजकीय, सामाजिक संघ, संस्थांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. तसेच भाजीमार्केट दुकानदार व शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांचे जिल्हाधिकाऱयांच्या अहवालाकडे लक्ष आहे. गैरमार्गाने खासगी भाजीमार्केटला परवाना दिलेल्या भ्रष्ट लाचखोर अधिकाऱयांवर न्यायालयात खटला दाखल करून त्यांच्यावर कारवाई होईस्तोपर्यंत हा प्रश्न सोडणार नाही, असे मत भारतीय कृषक संघाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी व्यक्त केले.
सतीश पाटील यांची प्रकृती खालावली
‘जय किसान’ विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी आमरण उपोषणास बसलेले सतीश पाटील यांची प्रकृती बुधवारी संध्याकाळी अचानक खालावल्याने त्यांना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱयां विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे.









