मुंबईतील संबंधित कंपनीकडून घोषणा
मालवण/प्रतिनिधी:-
रेडीसमोरील समुद्रात १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बुडालेल्या ‘त्या’बार्जमधील बेपत्ता चौघांचा शोध घेणाऱ्यांना पाच लाख रुपयांचे इनाम मुंबईतील श्रीकृष्ण स्टीव्हडोअर्स प्रा. लि. कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. सदर जहाज १ डिसेंबर रोजी जयगड बंदरातून गोव्याच्या दिशेने निघाले होते. २ डिसेंबरला मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हे जहाज रेडीसमोरील समुद्रात बुडाले. यातील १० खलाशांपैकी पाच जणांना कर्नाटकातील उडपी येथील ट्रॉलर्सनी वाचवले. या पाचही जणांना लाईफ जॕकेटसचा फायदा झाला. अन्य पाच जणांपैकी एकाचा मृतदेह कोस्ट गार्डला समुद्रात आढळून आला. तर अन्य चौघांचा गेल्या तीन दिवसांपासून शोध सुरू आहे. बेपत्ता खलाशांचा शोध घेणाऱ्या व्यक्तींना पाच लाख रुपयांचे इनाम कंपनीकडून दिले जाणार आहे.








