अपात्रता प्रकरणी सुनावणी 28 ऑगस्ट रोजी
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 12 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरील सुनावणीबाबत सभापती राजेश पाटणेकर यांनी केलेली विनंती मान्य झाल्याने ती सुनावणी दोन आठवडय़ांनी पुढे ढकलण्यात आली आहेत. ती आता गणेश चतुर्थीनंतर दि. 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बोबडे यांच्यासमोर काँग्रेस व मगो पक्षाच्या या दोन याचिका सुनावणीसाठी होत्या. काल मंगळवारी दुपारी त्यावर सुनावणी होणार होती. ऑनलाईनद्वारे होणाऱया सुनावणीसाठी एकूण 15 याचिका न्यायालयासमोर होत्या. काँग्रेसची बाजू कपिल सिब्बल मांडणार होते, तर भाजपची बाजू मुकूल रोहतगी, श्याम दिवाण, तुषार मेहता इत्यादी वकील मांडणार होते, मात्र सभापती राजेश पाटणेकर यांनी दोन आठवडय़ांची जी मुदत मागितली त्यानुसार ही सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यामुळे बाराही आमदारांना आणखी 14 दिवसांची मुदत मिळाली आहे. एकूण 15 प्रकरणांवर मंगळवारी सुनावणी होणार होती. 14 याचिकांवर सुनवणी झाली. 15 वे प्रकरण हे गोव्याचे होते. तेच नेमके पुढे ढकलले गेले. अर्थात प्रतिवादी सभापतींनी एका परिपत्रकाद्वारे आणखी काही दस्तावेज सादर करण्यास वेळ मिळावा यासाठी दोन आठवडय़ांची मुदत मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली. या प्रकरणाकडे साऱया गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून राहिले होते. सुनावणी पुढे ढकलली गेल्याने पुन्हा काही दिवस प्रतिक्षेत रहावे लागेल.









