नियुक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, ता. पं.-जि. पं.ला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बिजगर्णी ग्राम पंचायतवर 2018-19 या वर्षात पीडीओ म्हणून नंदिनी कल्याणी यांनी काम पाहिले. मात्र, त्या हेकेखोर आहेत. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता कामे केली आहेत. याचबरोबर सर्वसामान्य जनतेची कामेही त्या करत नाहीत. त्यामुळे त्यांना यापूर्वीच विरोध करण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची ग्राम पंचायतीवर पीडीओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे बिजगर्णी व इतर ग्रामस्थांनी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतवर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात निवेदन दिले.
सदर पीडीओ मनमानी कारभार करत असतात. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी विरोध केला असताना याच ठिकाणी त्यांची नेमणूक करणे हे योग्य आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत बिजगर्णी ग्राम पंचायतवर त्यांची नियुक्ती करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
बिजगर्णी ग्राम पंचायतीला यळेबैल, राकसकोप, कावळेवाडी ही गावे संलग्न आहेत. बऱयाच वेळा त्या गावातील नागरिक कामासाठी येतात. मात्र, त्यांची कामे करण्यास त्या टाळाटाळ करतात. कोणतीच विकासकामे होत नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना ग्राम पंचायत पीडीओ म्हणून नेमणूक करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याकडे देण्यात आले. जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांनाही हे निवेदन देण्यात आले.
यावेळी ऍड. नामदेव मोरे, मनोहर बेळगावकर, मारुती जाधव, वसंत अष्टेकर, अब्दुल नावगेकर, मनोहर पाटील, सुरेश कांबळे, दीपक कांबळे, महेश पाटील, परशराम पाटील, ग्राम कमिटीचे अध्यक्ष गुंडू पाटील, परशुराम दुर्गु पाटील, कल्लाप्पा अष्टेकर, बबन जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









