हनीट्रप प्रकरणी झाली होती अटक, आणखी अनेकांना जाळय़ात अडकविल्याचे उघड
प्रतिनिधी / बेळगाव
हनीट्रप प्रकरणी बुधवारी माळमारुती पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कोठडी दिली असून पोलिसांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
गौरी सुरेश लमाणी (वय 28, रा. यल्लम्मागुड्डतांडा, सौंदत्ती), मंजुळा लक्काप्पा जुटेण्णावर (वय 29, मुळची रा. चुंचनूर, ता. रामदुर्ग, सध्या रा. बेडसूर, सौंदत्ती), संगीता प्रकाश कनकीकोप्प (वय 30, रा. उगरगोळ, ता. सौंदत्ती), रघुनाथ ग्यानू धुमाळे (वय 28, मुळचा रा. हुलगबाळी, ता. अथणी, सध्या रा. खडेबाजार), सदाशिव सिध्दाप्पा चिप्पलकट्टी (वय 33, रा. नेहरुनगर) अशी त्यांची नावे आहेत.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्यावर 120 (बी), 384, 395 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्व पाचजणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
जमखंडी येथील एका पत्रकाराने दिलेल्या फिर्यादीवरुन या टोळीला अटक झाली आहे. केवळ बेळगावच नव्हे तर यरगट्टी, घटप्रभा, अथणी परिसरातही त्यांनी आपले कारणामे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र बेअब्रु होण्याच्या भितीने कोणीच या टोळी विरुध्द एफआयआर दाखल केले नाही.









