गेल्याच महिन्यात सांगली जिह्यातील देवराष्ट्रे या गावातील एक अल्पशिक्षित फॅब्रिकेशन व्यवसायिक दत्तात्रय गुरव यांनी भंगारातील साहित्यापासून जुगाड जीप बनवली. समाज माध्यमांवरुन ही माहिती पसरत उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी गुरव यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. हे वाहन उत्तम बनवले असले तरीही भविष्यात ते चालवताना त्यांना परवानग्या आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकेल. त्याऐवजी त्यांनी बनवलेली ही गाडी स्वीकारून आपण त्यांना एक बोलेरो गाडी बक्षीस देण्यास तयार आहोत. त्यांनी बनवलेली गाडी आपल्या अभियांत्रिकी विभागातील लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून महिंद्रा कंपनीच्या कार्यशाळेत ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. लवकरच गुरव परिवार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल अशी आशा आहे. याच दरम्यान आता आणखी एक जुगाडची माहिती पुढे आली आहे. सांगलीतील काकानगर भागात गॅरेज चालवणाऱया आणि सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या अशोक आवटी या मेकॅनिकने भंगारातील साहित्य आणि दुचाकी इंजिनचा जुगाड करत 1930 सालच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे. टाळेबंदीच्या काळात युटय़ुबवर पाहून गेली दोन वर्षे आवटी साहित्याची जमवाजमव करत होते. दहा वर्षांपूर्वी याच आवटी यांनी गॅरेजमध्ये वीज नाही म्हणून भंगारच्या साहित्यातून स्वतःची पवनचक्की उभी केली होती. अल्पशिक्षित असले तरी अनुभवाच्या जोरावर असे अनेकविध उपक्रम राबवणाऱया माणसांच्या पंखात बळ भरण्याची आवश्यकता आहे. सुशिक्षित आणि अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रोत्साहन देत स्टार्टअपद्वारे कोटय़वधी रुपयांचे भांडवल उभे केले जाते. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. पण त्यांच्याप्रमाणेच ग्रामीण भागात अभावग्रस्त असून सुद्धा पोटाला चिमटा काढून प्रयोग करणारे जे लोक आहेत त्यांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी आशा मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी गावपातळीपासून देशपातळीपर्यंत एखादी व्यवस्था उभा करणे, प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शन, निर्मिती, कायदे, भांडवल उभारणी, करार, निर्मिती, विक्री व्यवस्था, अनुदान आदी ज्ञान देणे आता काळाची गरज बनली आहे. यवतमाळ जिह्यातील हिमांशू धावडे नाने एक युनिटमध्ये पन्नास किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक सायकल बनवली होती. पॉलिटेक्नीकचे शिक्षण घेतलेल्या त्याला स्वतःचा स्टार्टअप निर्माण करण्याची इच्छा आहे. त्याच्याच सारखा प्रयोग करणारा दीलेश परखडे ट्रक्टरला बैलगाडीची रबरी चाके बसवतो आणि सोयाबीनसहीत दाट पिकात, चिखलातसुद्धा सुरक्षितपणेऔषध फवारणी करू शकेल असे वाहन निर्माण करतो. दिवसाला पस्तीस एकरावर फवारणी करणारे हे यंत्र शेतकऱयाचा जीव जाऊ देत नाही आणि कमी पैशात मोठय़ा प्रमाणावर आणि अत्यल्प वेळेत फवारणी करू शकतो. हे यंत्रसुद्धा भंगारातील साहित्यातून बनवले होते. शेती फायद्यात आणायची तर त्यातील भांडवली गुंतवणूक कमी होण्याची आवश्यकता आहे असे सर्वच जण सांगतात. पण अशा प्रयोगांना पाठबळ दिले पाहिजे. देशभर असे असंख्य प्रयोग सुरू आहेत आणि युटय़ुबवर येत आहेत. इतर युवक आपापल्या भागात त्याचे प्रयोग करत आहेत. या सर्वांना प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रयोग व्यवसायात रुपांतरीत होतील आणि त्यातून चांगले उद्योग उभे राहतील असा प्रयत्न करणारी एखादी यंत्रणा असण्याची सक्त आवश्यकता आहे. ती नव्याने उभारण्यापेक्षा आहे त्यातील काही लोकांनी मनावर घेऊन जर सुरूवात केली आणि त्यांना भांडवल पुरवठा झाला तर भारतात अभ्युदयाचा एक आगळावेगळा प्रयोग यशस्वी झाल्यावाचून राहणार नाही. आज पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती आणि विजेवर चालणारी वाहने निर्माण करण्यासाठी किंवा त्यांची विक्री वाढवण्यासाठी महाराष्ट्रसारख्या राज्यांनी कायदा केला आहे. देशातील सर्वच राज्ये महाराष्ट्राचा हा कायदा आपल्या राज्यात राबविण्याच्या विचारात आहेत. मात्र त्यासाठी मोठय़ा यंत्रणा वापरायच्या की अशा छोटय़ा माणसांनाही प्रोत्साहन देऊन परवडणारे, लोक स्वतः करु शकतील असे प्रयोग करायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे. सरकार बरोबरच सामाजिक उत्तरदायित्व निधी वेगळय़ा ठिकाणी खर्च करणाऱया भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जर या विषयात लक्ष घातले तर प्रत्येक जिह्यात अशी एक प्रयोगशील माणसांची फळी उभी करता येणे शक्मय होईल. त्यातून लोकांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवण्याचे आणि स्वस्तातील पर्याय उपलब्ध करून देण्याचे ध्येय साध्य होऊ शकेल. गेल्या वषीच्या ऑगस्ट महिन्या दरम्यान यवतमाळ जिह्यातील फुलसावंगी गावात शेख इस्माईल नावाच्या 28 वषीय युवकाने स्वतःचे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. आठवीपर्यंत शिकलेल्या आणि वेल्डिंगचे वर्कशॉप चालवणाऱया शेख इस्माईलला पुरेसे मार्गदर्शन मिळाले नव्हते. मात्र तरीही त्याने हेलिकॉप्टर बनवले आणि एक यशस्वी ट्रायल घेऊनही दाखवली. त्यानंतर त्याचा दुसरा प्रयोग सुरू असताना दुर्घटना घडली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. योग्य वेळी या युवकाला मार्गदर्शन घडले असते तर त्याच्याकडून आज विविध क्षेत्रात उपयोगात येतील असे यंत्र उभा करणे शक्मय झाले असते. कदाचित भारतीय तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांच्या मदतीतून शेख हा देशातील एक प्रेरक बनला असता. मात्र त्याच्या अपघाती मृत्युने त्याच्या कुटुंबाला संकटात ढकलून दिले आहे. अशा दुर्घटना आणि दुर्लक्ष टाळले, ग्रामीण जिद्दीच्या माणसांना जर मार्गदर्शन केले आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा उभी केली तर ती उपकारक बाब ठरेल. समाजाचे हित विचारात घेऊन या प्रयोगांना साथ देणारी यंत्रणा लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
Previous Articleप्रियंका वड्रा यांच्या सचिवाने लाच मागितल्याचा आरोप
Next Article विजेचा धक्का बसून 3 जवानांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








