तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, न्यायालयाच्या निकालाने समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये या घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. या घटनेने तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला होता. अखेर त्या नराधमांना न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा आणि 25 लाख 38 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकाल असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संजू सिद्धाप्पा दड्डी (वय 24), सुरेश भरमाप्पा बेळगावी (वय 24), सुनील लगमाप्पा डुमगोळ (वय 21, तिघेही रा. मुत्यानट्टी), महेश बाळाप्पा शिवनगोळ (वय 23, रा. मणगुत्ती, ता. हुक्केरी) आणि सोमशेखर दुरदुंडेश्वर शहापूर (वय 23, रा. बैलहोंगल) अशी त्या आरोपींची नावे आहेत. या पाच जणांच्याविरोधात भा.दं.वि. 376(बी), 395, 341, 354, 385, 504, 506 व पोक्सो 4, 6, 12 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालय आणि पोक्सो न्यायालयात यांना गुरुवारी दोषी ठरविले होते. शुक्रवारी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बेळगाव येथील हॉस्टेलमध्ये राहणाऱया अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने मुत्यानट्टी परिसरात फिरण्यासाठी नेले होते. 15 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गेले असता वरील पाच जणांनी त्या दोघांनाही अडविले. त्यानंतर शिवीगाळ करुन मारहाण केली होती. अल्ववयीन मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केले. त्याचा व्हिडीओही तयार केला. याचबरोबर दोन्ही मोबाईल घेऊन 20 हजार रुपये द्या, अशी मागणी केली होती. ही घटना कोणालाही सांगायची नाही असे म्हणून त्यांना धमकीही देण्यात आली होती. पुन्हा पैशाची वारंवार मागणी करण्यात आली.
त्यानंतर या दोघांनी काकती पोलीस स्थानकात त्या पाच जणांविरोधात फिर्याद दिली. काकती पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी पाहणी करुन गुन्हा केला दाखल केला होता. न्यायालयात दोषारोपही दाखल केले होते. न्यायालयाने 33 साक्षी, 186 कागदपत्रे पुरावे, 46 मुद्देमाल तपासले. त्यामध्ये पाचही आरोपी दोषी आढळले होते. त्या सर्वांना न्यायाधीश मंजप्पा अन्नयण्णावर यांनी जन्मठेपची शिक्षा सुनावली. आरोपी क्रमांक 1 व 2 यांना 5 लाख 21 हजार रुपये दंड, तर आरोपी क्रमांक 2 व 4 यांना 5 लाख 11 हजार रुपये तर आरोपी क्रमांक 5 याला 5 लाख 6 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सरकारी वकीलांचा युक्तिवाद महत्त्वाचा
या खटल्यात सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयासमोर आरोपींनी जे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले त्याची संपूर्ण माहिती न्यायालयात मांडली. या सर्व नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयासमोर मांडली. त्यामुळेच या नराधमांना जन्मठेपेची शिक्षा आणि मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.









