करमाळा / प्रतिनिधी
सध्या करमाळा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह, चिखलठाण एकंदरीत तीन व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी बिबट्यास ठार मारण्याची परवानगी दिली आहे.
१६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या दरम्यान बीड, अहमदनगर व सोलापूर वनविभागात बिबटयाने केलेल्या हल्ल्यामुळे 9 जणांचा मृत्यू व ३ गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अनेक जनावरांचा देखील फडशा या बिबट्याने पाडला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता अखेर महाराष्ट्र राज्य प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी काल (दि. ६) एक आदेश काढून (आदेश क्रमांक कलम ११/११/२०२०-२१ क्रमांक कक्ष २३ (४) प्र . क्र. ५३ (२०२०-२१) २००१ )सदर बिबटयास गरजेप्रमाणे तज्ञांचे उपस्थितीत बेशुध्द करून बंदीस्त करण्याची तसेच जेरबंद / बेशुध्द करणे शक्य न झाल्यास सदर बिबटयाला अधिक मनुष्य हानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सदर आदेश ३१ जानेवारी २०२१ पर्यंतच वैध राहिल असे त्यात नमूद केले आहे. तसेच शक्यतो सर्व पर्यत्न करून बिबटयाला जेरबंद बेशुध्द करण्यास प्राधान्य द्यावे. सदर बिबटयाला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पारितोषक जाहिर करण्यात येऊ नये.
आवश्यकतेनुसार स्नायफर ङॉगची सहायता घेण्यात यावी. सदर बिबटयास जेरबंद बेशुध्द आणि ते शक्य न झाल्यास त्याला ठार करण्याच्या कार्यवाहीला एकंदर नियोजनाकरिता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई हे समन्वय अधिकारी राहतील सदर कार्यवाही करण्यास मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) औरंगाबाद आणि मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे यांना व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी , कर्मचारी ,पोलीस अधिकारी, इतर व्यक्ती यांना अधिकृत करण्यात येत आहे असे या आदेशात नमूद केले आहे.









