प्रतिनिधी / बेंगळूर
दोन महिला आयएएस अधिकाऱयांमध्ये सुरू असलेल्या वादाचा परिणाम त्यांच्या बदल्यांमध्ये झाला आहे. म्हैसूरच्या जिल्हाधिकारी रोहिणी सिंधुरी यांनी आपला मानसिक छळ केला आहे, असा आरोप करून म्हैसूर महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग यांनी राजीनामा दिला होता. दरम्यान, राज्य सरकारने शनिवारी शिल्पा नाग यांची ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याच्या ई-प्रशासन विभागात संचालक पदावर नेमणूक केली आहे. तर रोहिणी सिंधुरी यांची धर्मादाय खात्याच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याच दरम्यान, वाणिज्य कर खात्याचे अतिरिक्त आयुक्त असणारे बगादी गौतम यांची म्हैसूरच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी रविवारी सकाळी रोहिणी सिंधुरी यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी पदाच पदभार स्वीकारला. तर महापालिका आयुक्तपदी अन्न आणि नागरी पुरवठा निगमच्या व्यवस्थापन विभागाचे आयुक्त लक्ष्मीकांत रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बदली रद्द करण्यासाठी खटाटोप
आपली जिल्हाधिकारी पदावरून उचलबांगडी झाल्याची माहिती मिळताच रविवारी सकाळी रोहिणी सिंधुरी यांनी बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विनंती केली. महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग यांनी आपल्यावर केलेले आरोप निराधार आहेत. काही राजकारणी आपल्याविरोधात कारस्थान करीत आहेत, आरोप केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सध्या बदली करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करा, असे स्पष्ट बजावल्याचे समजते.









