बरेच प्राणी रस्त्यावर मोकाट फिरत असतात. कुत्रे, गायी, बैल, घोडे यांना वालीच नसतो. बरेच मालक आजारी कुत्र्यांना, मांजरांना सोडून देतात. भटक्या कुत्र्यांना दुखापती होतात. ते आजारी पडतात. पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मुंबईच्या फिजा शहा यांनी मात्र या बेवारस जीवांना आधार दिला. त्यांची जबाबदारी स्वीकारली. आपल्या फार्म हाऊसचं रुपांतर प्राण्यांच्या अनाथालयात केलं. आज असंख्य प्राणी इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
फिजा शाह यांनी 21 वर्षांपूर्वी स्नोवी नावाच्या कुत्र्याला गमावलं. स्नोवी हा त्यांनी सुटका केलेला पहिला कुत्रा होता. गेल्या वर्षी मस्तू नावाच्या कुत्र्याने फिजा यांच्या मांडीवर प्राण सोडले. मस्तूच्या जाण्यामुळे फिजा खूप दुःखी झाल्या. आपण मनाला कितीही समजावलं तरी लाडक्या कुत्र्यांचा विरह सहन होत नाही, असं फिजा सांगतात. स्नोवी हा फिजा यांनी सुटका केलेला पहिला कुत्रा. त्यानंतर त्यांनी जवळपास 300 प्राण्यांची सुटका केली. यात कुत्रे, बकर्या, ससे, गायी, बैल, घोडे, कोंबडय़ा, मांजरं, बदकं यांचा समावेश आहे. फिजा यांचं विरारमध्ये सहा एकर परिसरात पसरलेलं फार्म हाऊस आहे. त्यांनी याच फार्म हाऊसचं रुपांतर प्राण्यांच्या अनाथालयात केलं आहे. वयस्कर, जखमी, आजारी, अनाथ प्राण्यांच्या पुनर्वसनाच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. शहा यांच्या अनाथालयात 15 कर्मचारी आहेत. इथल्या प्राण्यांच्या देखभालीची सगळी जबाबदारी या कर्मचार्यांवर आहे.
फिजा यांनी या फार्म हाऊसची विभागणी वेगवेगळ्या विभागांमध्ये केली आहे. त्यामुळे सर्व प्राणी सुखाने एकत्र नांदतात. त्यांनी बदकं आणि बगळ्यांसाठी छोटा तलावही बांधला आहे. स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असणार्या प्राण्यांनाच या अनाथालयात आणलं जातं. भटक्या कुत्र्यांना अशा पद्धतीने चार भिंतीत बंद करणं योग्य नसल्याचं फिजा यांना वाटतं. आपण त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करू शकतो. आजारी, अशक्त, जखमी प्राण्यांनाच अनाथालयात आणलं जातं, असं त्या सांगतात.
या प्राण्यांच्या देखभालीचा खर्च फिजा स्वतःच उचलतात. सर्व प्राण्यांच्या देखभालीसाठी महिन्याला जवळपास चार लाख रुपये खर्च करावे लागतात. यात प्राण्यांचं अन्न, देखभाल, औषधोपचार तसंच कर्मचार्यांचा पगार यांचा समावेश आहे. फिजा यांनी कौटुंबिक व्यवसायातून पाच वर्षांपूर्वी निवृत्ती पत्करली. त्यांनी प्राण्यांवरच्या प्रेमापोटी ही संस्था सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या देखभालीबाबत त्या अजिबात तडजोड करत नाहीत. प्रत्येक प्राण्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आठवडय़ाला दोन हजार रुपये खर्च करायला त्या मागे-पुढे पहात नाहीत. फिजा कधीच प्राणीप्रेमी नव्हत्या. पण स्नोवीच्या मृत्यूनंतर त्यांना प्राण्यांबाबत प्रेम आणि आपुलकी वाटू लागली. जखमी, आजारी प्राण्यांना आपली गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुरूवातीला त्या प्राण्यांना डॉक्टरांकडे नेत असत. पण नंतर त्यांना अनाथालयाची गरज वाटू लागली आणि त्यातूनच विरारच्या फार्म हाऊसवर हे अनाथालय साकारलं. फिजा यांनी पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या श्वानांनाही दत्तक घेतलं आहे. त्यांचं प्राणीप्रेम कौतुकास्पद आहे.









