आजाराचे निदान स्पष्ट : कुटुंबीयावर मोठे संकट : पशुपालकांनी खबरदारी घेण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारपेठ, टिळकवाडी येथील गवळी कुटुंबीयाची जनावरे दगावण्याचा प्रकार सुरूच आहे. मंगळवारी रात्री त्यांची आणखी एक दुभती म्हैस दगावल्याने कुटुंबीय मोठय़ा अडचणीत सापडले आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांत या कुटुंबीयाच्या तब्बल बारा म्हशी दगावल्याने मोठा फटका बसला आहे. दगावलेल्या जनावरांना ‘मॅलिगन्ट कटरल फिव्हर’ हा रोग झाल्याचे पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱयांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. या व्हायरल आजारावर कोणताच उपाय नाही. त्यामुळे पशुपालकांनी जागरुक होऊन खबरदारी घ्यावी, अशा सूचना खात्याने केल्या आहेत.
एक दिवसाआड जनावरे दगावत गेल्याने गवळी कुटुंबीयासमोर चिंता निर्माण झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱयांना रोगाचे निदान झाले नव्हते. दगावलेल्या जनावरांचे नमुने बेंगळूरला पाठविण्यात आले होते. दरम्यान, रिपोर्ट येईपर्यंत पुन्हा दोन म्हशी दगावल्याने कुटुंबीयाबरोबर डॉक्टरांच्या चिंतेत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथील पशुसंगोपन खात्याचे तज्ञ डॉ. शिवकुमार, संजीव तोप्पन, डॉ. संगनगौडा यांनी बुधवारी तातडीने जनावरे दगावलेल्या गवळी कुटुंबीयाच्या गोठय़ाला भेट दिली. मंगळवारी दगावलेल्या म्हशीचा पंचनामा केला. बेंगळूर येथून दाखल झालेल्या तज्ञांनी दगावलेल्या जनावरांचे रिपोर्ट आणले असून ही जनावरे मॅलिगन्ट कटरल फिव्हर या रोगाचे बळी ठरल्याचे निदान केले आहे. हा व्हायरल रोग असल्याने यावर कोणताच उपाय नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी म्हणून जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.
रोगाची लक्षणे…
- जनावरांना भरपूर ताप येतो.
- डोळे लाल होतात.
- श्वसन क्रियेत अडथळा येतो.
- हा व्हायरल रोग असल्याने लवकर समजून येत नाही.
- या आजारावर लसीकरण नाही.
खबरदारी …
- या रोगाचा मनुष्याला कोणताच धोका नाही.
- गोठय़ात भरपूर सूर्यप्रकाश हवा.
- शेळय़ा-मेंढय़ांपासून जनावरांना दूर ठेवणे.
- गोठय़ात हवा खेळती ठेवणे.
- जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे.
- गोठा स्वच्छ ठेवून जनावरांचे विलगीकरण करणे.









