मच्छे येथील कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरण भोवले
प्रतिनिधी / बेळगाव
मच्छे येथील मराठी कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱया बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी ही कारवाई केली आहे.
शिवसेना कार्यालयावरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केली म्हणून मच्छे येथील तीन तरुणांवर एफआयआर दाखल करण्यात आले होते. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. यासंबंधी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला होता. चौकशीत मारहाण केल्याचे उघडकीस आल्याने गोविंद पुजारी, नारायण चिप्पलकट्टी, चन्नाम्मा हुनशाळ या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस स्थानकातील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून मारहाणीचा प्रकार उघडकीस आला होता.









