बेंगळूर/प्रतिनिधी
अश्लील व्हिडिओ प्रकरणात अडकलेले भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी आणखी अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणातील तरुणीने जारकिहोळी यांच्याकडून आपल्या जिवाला धोका असल्यामुळे संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. यावरुन काँग्रेस ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
जारकिहोळी यांच्या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांकडून सरकारवरची कोंडी केली जात आहे. त्यातच संबंधित तरूणीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. ”ते मला व माझ्या कुटुंबाला ठार मारू शकतात. मी जारकीहोळी यांच्याकडून सुरू असलेल्या छळामुळे त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार आहे”, असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले होते.
सिद्धरामय्या यांनी, पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. याचबरोबर तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही सांगितले आहे. त्या तरुणीचे काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, गृहमंत्री बी.एस.बोम्माई आणि संपूर्ण कर्नाटक भाजप यासाठी जबाबदार असेल. त्या तरुणीने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलेले पत्र धक्कादायक आहे, असे म्हंटले.
येडियुरप्पांचे सरकार खरंच राज्यात काम करीत आहे का? त्या तरुणीने एवढे आरोप करुनही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी काहीही कारवाई केली नाही. केवळ सरकारकडून बैठका सुरू असून, त्यातून कोणताही निर्णय समोर आलेला नाही. पीडितेच्या आरोपांची चौकशी करण्यात सरकारला यश आले नसून, याला कर्नाटक भाजप जबाबदार आहे का? ती सीडी समोर येऊन २७ दिवस उलटल्यानंतरही काहीच कावाई झालेली नाही. नेमका सरकारवर कुणाचा दबाव आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा याशिवाय आणखी कोणता पुरावा असू शकतो, अशी टीकाही सिद्धरामय्यांनी केली आहे.