कुठ्ठाळी हून पारंपाई 3 कि.मिटर अंतर गाठल्याचे आश्चर्य बुडणाऱया वेर्णा येथील इसमाला मडकईच्या युवकांनी वाचविले
महेश गावकर / फोंडा
पारंपाई मडकई येथील काही सतर्क तरूणांच्या कौशल्यामुळे खोल समुद्रात (जुवारी नदीच्या मधोमध) बुडणाऱया एका इसमाचे प्राण वाचविण्यात युवकांच्या टोळक्यांनी यश मिळवले. सुरेश सिताराम पंडित(53, केसरव्हाळ-वेर्णा) असे त्याचे नाव आहे. तो गटागंळया खात असताना मदतीसाठी केलेला आक्रोश ऐकून धाव घेतलेल्या काही तरूणांनी दाखविलेल्या कर्तबगारीमुळेच एका गरीब कुटूंबांचा आधार असलेला सुरेश पंडित यांचा जीव वाचले, या मदतकार्यातून चहा टपरीवर मौजमजा करणाऱया युवकांनी माणूसकीचे दर्शन घडविले आहे. सदर घटना बुधवार 27 जाने. रोजी घडली होती.
प्राप्त माहितीनुसार सदर इसम कुठ्ठाळी येथे मारूती देवस्थानात वर्धापनदिनानिमित्त दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शन व तिर्थप्रसाद घेतल्यानंर मोकळी हवा घेण्यासाठी जुवारी नदीच्या पात्राजवळ गेला असता पाय घसरून नदीत कोसळला. भरतीच्या प्रवाहात कुठ्ठाळीहून ते पारंपाई मडकई येथे मधोमध पोचला होता. सदर घटना बुधवार 27 जानेवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी या युवकांनी नदीला आलेल्या भरतीचाही विचार केला नाही, महेश याची होडी आणून तातडीने मदतकार्य करून माणूकीचे दर्शन घडविले.
प्रितमच्या चहा टपरीमुळेच बुडणाऱया इमसाला जिवनदान
मागील फक्त एक महिन्यापासून पारंपाई येथे प्रितम नदीकाठी चहाची टपरी चालवित आहे. येथे वीजेच्या प्रकाश पाहून बुडणाऱया सुरेशने आरडाओरडा सुरू केला. प्रितमने कुणी मासेमारी बुडत असल्याचा संशय व्यक्त केला व आपला मित्र महेश यांच्या मोटरच्या होडीने अन्य काही मित्रासह त्याच्या मदतीसाठी पाठवून दिले. तसेच त्याबाजूने येत असलेल्या अन्य एका मासेमारी मित्राची मदत घेतली व बुडणाऱयांना नदीकाठी आणले. यावेळी तो अल्पप्रमाणात श्वासोश्वास घेत होता. तत्परतेने 108 रूग्णवाहिकेला फोन लावला असता महाराष्ट्र येथे लागल्याने थोडा विलंब झाला. त्यानंतर फोंडा पोलीस स्थानकांची मदतीने तात्काळ रूग्णवाहिकेची सोय करण्यात आली व त्याला मडकई येथील आरोग्य केंद्रातून बांबोळी येथे रवानगी करण्यात आली.
घटनेतून ‘देव तारी त्याला कोण मारी’..याची खरी अनुभूती
जुवारी नदी ते पारंपाई मडकई हा जलमार्ग साधारण 3 कि. मिटर प्रवास आहे. कसलाही आधार न घेता केवळ हात पाय मारत तो पारंपाई मडकई येथे नदीच्या मधोमध कसा पोचला याबाबत येथील युवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याला जिवदान दिलेल्या युवकांच्या मुखातून ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची खरी अनूभूती आम्हाला झाल्याचे ते सांगत होते. बांबोळी येथे तो शुद्धिवर आल्यानंतर त्याने आपली ओळख सांगितली येथील डॉक्टरांना आपल्या घरातील मोबाईल नंबरशी संपर्क केल्यानंतर शेवटी त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याच्या मुलाने पोलिसाकडून सर्व हकीकत ऐकली व बुडणाऱया आपल्या बाबांचे प्राण वाचविणाऱया युवकांशी संपर्क केला व त्य़ाचे आभार व्यक्त केले. तसेच त्याची प्रकृती सुधारल्यानंतर खास सर्व युवकांना भेटण्यासाठी येणार असे कळविले आहे. सद्या त्याला बांबोळी येथील गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला असून आराम करण्यासाठी घरीच राहण्याचे ताकीद दिली आहे. तो पेशाने गवंडी असून केसरवाल वेर्णा येथील आपल्या घरात पत्नीसह, एक मुलगा व मुलगीसह राहत आहे. त्याचा मुलगा बीकॉम शिकत आहे. त्याच्या कुटूंबियांनी देवरूपाने धावून आलेल्या सर्व कुटूंबियांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे. यावेळी पारपांई मडकई येथे प्रितम यांच्या चहा टपरीवर टाईमपास करणाऱया युवकांने धाडस दाखविल्यामुळे फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी तसेच वेर्णा पोलीस स्थानकानेही अभिनंदन केले आहे. या युवकामध्ये स्वतः प्रितम नाईक यांच्यासह राजेश नाईक, रजनीकांत नाईक, महेश लक्ष्मण नाईक, राजेश नाईक, सुदाम नाईक, मच्छिद्र नाईक, प्रितेश नाईक, प्रताप नाईक, महेश एस. नाईक, उमाकांत नाईक, पांडुरंग नाईक यांनी मतदकार्य केले.









