सातारा / प्रतिनिधी :
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले जाते. त्याकरिता लाकूड पुरवठा कदम यांच्या वखारीतून केला जात होता. त्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी लगेच कार्यवाही करून लाकूड पुरवठा करणारा ठेकेदार बदलला अन् अग्निकुंडात लाकूड किती टाकले जाते, याची नोंद ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली.
सातारा शहरात दररोज कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. शहरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये अनेक बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. त्या मृतांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्याकरिता सातारा पालिकेकडून लाकूड पुरवठा व कर्मचारी सुविधा पुरवण्यात येतात. याच लाकूड पुरवठयात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावरून पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने लगेच लाकूड पुरवठा करण्याचे टेंडर काढण्यात आले.
टेंडर काढण्यापूर्वी जो लाकूड पुरवठा करणारा होता त्याच्याकडून टेंडर काढून अन्य ठेकेदाराला ठेका देण्यात आला. तसेच त्या ठिकाणी लाकूड किती प्रमाण अग्निकुंडात टाकले जाते. ते मोजण्यासाठी पालिकेचा अधिकारी नेमण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रत्येक अंत्यसंस्कार करतेवेळी लाकूड मोजले जात आहे. दरम्यान, सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्याऐवजी अजून, ही त्या अधिकाऱ्याकडे आरोग्य विभागाचा कार्यभार आहे. त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.