प्रतिनिधी / बेळगाव
केंद सरकारने शेतकऱयांविरोधात जे जाचक कायदे केले आहेत ते रद्द करण्यासाठी 4 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात आम्ही हा मोर्चा काढणार असून आम्हाला मोर्चा काढण्यास परवानगी द्या, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱयांविरोधात केंद्र सरकारने कायदे केले आहेत. त्याचबरोबर हलगा-मच्छे बायपास हा रस्ता रद्द करावा, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी रयत संघटना राज्य संचालक गणेश इळीगेर, सत्याप्पा मल्लापुरे, राजू मरवे, रमेश मडीवाळ, कुबेर गाणगेर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









