तांत्रिक चूक दुरुस्त करेतोवर क्रिकेट वर्तुळात मथीशा पथिराणाच्या त्या चेंडूची चर्चा
ब्लोमफौंटेन / वृत्तसंस्था
श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथीशा पथिराणाने भारताविरुद्ध डावातील चौथ्या षटकात एक चेंडू प्रतितास 175 किलोमीटर वेगाने टाकल्याची नोंद झळकल्याने क्षणभर सर्वत्र आश्चर्य व्यक्त झाले. शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडूचा 161.3 किमीचा 16 वर्षापूर्वीचा मागील विक्रम मोठय़ा फरकाने मोडीत निघाला की काय, अशी चर्चा सुरु झाली. पण, त्याचदरम्यान काहीच क्षणात रेकॉर्डिंगमधील तांत्रिक चूक झाल्याचे स्पष्ट झाले.
मथीशा पथिराणाने भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वालला टाकलेला तो चेंडू बराच बाहेर होता आणि अपेक्षेप्रमाणे मैदानी पंचांकडून वाईड देण्यात आला. पण, त्याचा वेग प्रतितास 175 किमी इतका नव्हता, हे नंतर स्पष्ट झाले. अर्थात, पथिराणाने चर्चेत येण्याची ही पहिली वेळ अजिबात नव्हती. लंकेच्या या उंचापुऱया गोलंदाजाची गोलंदाजी शैली लसिथ मलिंगाच्या शैलीशी बरीच मिळतीजुळती असून मलिंगाप्रमाणेच तो ही प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या तळपायाचा वेध घेणारे यॉर्कर्स टाकण्यात अतिशय माहीर मानला जातो. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पथिराणा कँडी ट्रिनिटी कॉलेजचे प्रतिनिधीत्व करत आला आहे.
आश्चर्य म्हणजे पथिराणाने पदार्पणाच्या लढतीतच मलिंगाप्रमाणे भेदक यॉर्कर टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हाच वेग, हीच भेदकता कायम राखली तर तो लंकन राष्ट्रीय संघातही दाखल होऊ शकेल, असे सध्याचे संकेत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू
प्रतिपास वेग / गोलंदाज / प्रतिस्पर्धी / वर्ष / ठिकाण
161.3 / शोएब अख्तर / इंग्लंड / 2003 / न्यूलॅण्डस
161.1 / शॉन टेट / इंग्लंड / 2010 / लॉर्डस
161.1 / ब्रेट ली / न्यूझीलंड / 2005 / नेपियर









