किटवाड येथे पोरकी झाली चिमुरडी : वयोवृद्ध आजीवर चिमुरडय़ांची जबाबदारी
प्रतिनिधी / कुदनूर
घरात अठराविश्व दारिद्रय़ अशातच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ‘त्या’ चिमुरडय़ांवर पोरकं होण्याची वेळ आली. गरीब परिस्थिती आणि वडिलांच्या अकाली निधनामुळे मामाच्या गावी राहात असताना आई सुद्धा काळाच्या पडद्याआड गेल्याने ‘त्या’ चिमुरडय़ांना आता गरज आहे, ती आधाराची.
किटवाड (ता. चंदगड) येथे मालन किसन बिर्जे ही पतीच्या निधनामुळे माहेरी आपल्या वयोवृद्ध आईकडे राहत होती. मुकबधीर असूनही, आईची दवा-पाणी आणि कृणाल-काजल या चिमुरड्य़ांच्या संगोपनासह घर चालविण्याची पूर्ण जबाबदारी मालन पेलत होती. मात्र, नियतीच्या मनात वेगळंच लिहून ठेवलेलं. चार दिवसांपूर्वी मालन मोलमजुरीसाठी जात असताना तिचा अपघात होऊन तिच्या डोक्याला जबर मार लागला. मार वर्मी लागल्यामुळे आसपासच्या दवाख्यान्यात दाखल करून घ्यायला कोणीही तयार झाले नाहीत. त्यामुळे अखेरीस कोल्हापूरच्या सीपीआर दवाख्यान्यात तिला दाखल करण्यात आले. मात्र, फार उशिर झाल्याने तेथेच तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली अन् मुलांसह वयोवृद्ध आईचा आधार कायमचाच नाहिसा झाला.
मालनला भाऊ नसून तीन बहिणी आहेत. मालन व तिच्या अजून एका बहिणीचा कालकुंद्रीत तर इतर दोघींना होसूर आणि अतिवाड येथे विवाह करून देण्यात आला आहे. मात्र, कालकुंद्रीत दिलेल्या मालनच्या पतीचे चार वर्षापूर्वी आकस्मिक निधन झाल्यामुळे ती मुलांसह किटवाडला आपल्या माहेरी आईकडे रहात होती. आईची देखभाल करत मुलांच्या शिक्षणासाठी ती झडपडत होती. कृणाल हा आठवीत तर काजल चौथी इयत्तेत शिकत आहे. आई-वडिलांचे छत्र गेल्याचे दुःख त्या मुलांच्या मनात आहेच पण, आता आजीचा सांभाळ कसा करायचा? असा प्रश्नही त्या मुलांना पडला आहे.
आता ह्या लेकरांचं कसं होणार…
मालनच्या निधनामुळे तिची आई कासावीस झाली असून, कृणाल आणि काजल या लेकरांची काळजी तिला लागली आहे. मालन मोलमजुरी करून आईचा सांभाळ करत होती आणि घरही चालवत होती. यात तिला तिच्या बहिणीही मदत करत पाठबळ द्यायच्या. त्यामुळे मालनच्या आईलाही थोडाफार आधार वाटायचा. मात्र, आता माझं वय झालयं, मी सतत आजारी असते. आता ह्या लेकरांचं कसं होणार या चिंतेच ती पडले आहे.









