मागील वर्षीपासून हिजबुल मुजाहिद्दीनसाठी सक्रीयपणे कार्य
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पुलवामास्टाईल हल्ला करण्याचा कट उधळून लावल्यानंतर आता पोलीस आणि लष्कराने दहशतवाद्यांविरोधात राज्यात व्यापक मोहीम सुरू केली आहे. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून फरार झालेल्या कारचालकाचा शोधही घेतला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सदर कारचा चालक हा शोपियामधील रहिवासी असून तो गेल्यावर्षीपासून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी सक्रीयपणे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा दलाने दोन दिवसांपूर्वी कारबॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळला होता. सदर कारचा मालक फरार असून यापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीस लावण्यात आलेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅन्ट्रो कारचा मालक शोपिया जिल्हय़ातील शरतपोरा गावचा रहिवासी असून त्याचे नाव हिदायतुल्लाह मलिक असे आहे. जुलै 2019 मध्ये तो हिजबुलमध्ये सामील झाला. तेव्हापासून काश्मीरमध्ये कार बॉम्बस्फोट घडविण्याच्या कटात तो गुंतला होता.
सदर दहशतवादी बॉम्बस्फोटासाठी कारच्या रचनेत बदल करण्यातही माहीर होता. दहशतवाद्यांनी येत्या काही दिवसात तीन ते चार कारबॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जैश-ए-महंमद या संघटनेकडूनही या कारबॉम्बसाठी सर्व तंत्रज्ञान पुरवले जात असल्याचेही समजते.