राज्य सरकारतर्फे आदेश जारी
प्रतिनिधी /पणजी
येथील आझाद मैदानावर गेले काही दिवस उपोषणास बसलेल्या शिक्षकांच्या वेतनात सरकारने रु. 6 हजार ते 9 हजार पर्यंत भरघोस वाढ जाहीर केली आहे. यासंदर्भात आदेश रात्री उशिरा राज्य सरकारने जारी केला आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकांना गोवा समग्र शिक्षा योजनेंतर्गत सेवेत घेण्यात आले. गेली कित्येक वर्षे सेवा बजावित आलेल्या या शिक्षकांच्या वेतनात तुटपूंजी वाढ केली जात होती. त्याचबरोबर त्यांना सेवेत कायम केले जात नव्हते. त्यामुळे हे शिक्षकवर्ग सरकार दरबारी आपल्या मागण्या पेश करून थकले होते. अखेरीस शिक्षकांनी गेल्या आठवडय़ापासून आझाद मैदानावर धरणे व उपोषण सुरू केले. सर्वच राजकीय नेत्यांनी शिक्षकांना पाठिंबा दिला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या शिक्षकांना आपली सहानुभूती दर्शविली आहे. या शिक्षकांच्या वेतनात 2020-21 या वर्षासाठी रु. 16,125 वरून रु. 22,000 पर्यंत रु. 6 हजारांची वाढ केली. आता दि. 21 जून 2021 पासून या सर्व शिक्षकांना रु. 25 हजारचे मानधन देण्यात येणार आहे. तसेच या सर्व शिक्षकांना त्यांची थकबाकीही लवकरच अदा केली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश गोवा समग्र शिक्षाचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. जी. घाडी यांनी रात्री उशिरा जारी केला.








