आरोपी शिंदे याला ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
नवारस्ता / प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ बाजारपेठेत बनावट शंभराच्या नोटांची विक्री करणारा संशयित आरोपी राजकुमार गणपती शिंदे वय ४१ रा. उंब्रज याला पाटण पोलिसांनी अटक करून पाटण न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालताने त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सूनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांना आरोपी शिंदे याच्याकडे शंभर रुपयांच्या ७० बनावट नोटा सापडल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.
याबाबत असे शनिवार दिनांक ३० रोजी तालुक्यातील मल्हारपेठ या गजबलेल्या बाजारपेठेत राजकुमार गणपती शिंदे वय ४१ रा. उंब्रज ता कराड हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून मल्हारपेठ येथे आला होता. त्यावेळी त्याने काही दुकाने,पान टपऱ्या मध्ये साहित्य खरेदी करत असताना त्याच्याकडे असलेल्या संशयास्पद नव्या शंभर रुपयांच्या बंडलमधून तो नोटा देत असल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे बाजारपेठेतील काही जागृत दुकानदारांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात याची माहिती दिली असता मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी शिंदे याने आपल्याकडे १०० रुपयांच्या ७० बनावट नोटा असल्याचे कबूल केले त्यांनतर आरोपी शिंदे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
दरम्यान रविवारी आरोपी राजकुमार शिंदे याला पाटण न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी शिंदे याला ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सूनावल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.