नवी दिल्ली/प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत सध्या वाद निर्माण झाला आहे. गीते यांनी शिवसेनेचे राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. या वक्तव्यावर राष्ट्रवादीने नाराजी जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार देशाचे नेते असल्याचं म्हटलं होतं. तसेच महाराष्ट्रातील सरकार चांगलं चाललंय. त्यामुळे गीते सारख्या लोकांच्या वक्तव्यांची दखल घेत नाही, असंही राऊतांनी म्हटलंय. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांना यावेळी अनंत गीते यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला काही माहिती नाही सांगत बोलण्यास नकार दिला. मात्र नंतर पत्रकारांनी पुन्हा विचारलं असता ते म्हणाले की, “शरद पवार देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र असून शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टीकेल. कारण या सरकारला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे”.
दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे त्यासंबंधी निर्णय घेतील. पक्षाचे प्रमुख यांसंबंधी निर्णय घेत असतात. या क्षणी आम्ही सरकारमध्ये एकत्र असून सरकार चांगलं चालत आहे”.