- भारतीय हवामान विभागाचा इशारा!
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘तौक्ते चक्रीवादळा’ने भारताच्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या भागांत अक्षरशः हाहाकार माजविला आहे. या वादळातून देश सावरलाही नाही तोच आणखी येत्या पाच दिवसांत भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 23 – 24 मे दरम्यान ‘यास’ चक्रीवादळ बंगालच्या खाडीला धडकण्याची शक्यता आहे. यावेळेस चक्रीवादळाला ‘यास’ हे नाव ओमानकडून देण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास 31 डिग्री सेल्सिअस आहे. सतत हवामान बदल आणि समुद्राच्या तापमानातील वाढीमुळे असे चक्रीवादळ येत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
21 मे पासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
अंदाजे 22 मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. 22 आणि 23 मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
‘









