मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती : आपदग्रस्तांना भरीव मदत देण्याची सरकारची भूमिका
आम्ही कुणालाही नाराज करणार नाही – वडेट्टीवार
प्रतिनिधी / मालवण:
तौक्ते चक्रीवादळामुळे देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या तीन सागरी तालुक्यांसह जिल्हय़ातील अन्य भागातही मोठय़ा प्रमाणात मच्छीमार, आंबा बागायतदार आणि शेतकरीवर्गाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण झाल्यावर आठवडाभरात आम्ही प्रत्यक्षात मदतीचे वाटप सुरू करू, अशी ग्वाही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिली.
तौक्ते चक्रीवादळग्रस्त देवबाग गावाची पाहणी वडेट्टीवार यांनी सकाळी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मनोज खोबरेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, साईनाथ चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, पल्लवी तारी, देवानंद चिंदरकर, देवानंद लुडबे, सरदार ताजर, ऍड. अमृता मोंडकर, अमृत राऊळ, गणेश पाडगावकर, इरशाद शेख, साक्षी वंजारी, मंदार शिरसाट, रमेश कद्रेकर, राजन कुमठेकर, अभय शिरसाट, जेम्स फर्नांडिस, दिलीप तळगावकर, भूषण खोत, बाबा मेंडिस तसेच अन्य उपस्थित होते.
कोणालाही नाराज करणार नाही!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: कोकणातील नुकसानीवर लक्ष ठेवून आहेत. नुकसानग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी ठाकरे सरकार कटिबद्ध आहे. आम्ही कोणालाही नाराज करणार नाही. निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे याहीवेळी निकषात बदल करून जास्तीत जास्त मदत दिली जाणार आहे. आम्ही हात आखडता घेणार नाही. बऱयाचशा मच्छीमार नौकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, याबाबत योग्य निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
देवबागसारखी गावे वाचविणार
तौक्ते चक्रीवादळाची भीषणता पाहता देवबागसारखी अनेक गावे भविष्यात सागरी अतिक्रमणाच्या तडाख्यात सापडून उद्धस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाडीकिनारी आणि समुद्रकिनारी योग्यप्रतीचे बंधारे होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ग्रामस्थांनी तक्रारी केलेल्या बंधाऱयांच्या चौकशीसाठी मंत्रालयात लवकरच आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देवबागमध्ये अद्ययावत सक्षम बंधारा नाही झाला, तर भविष्यात देवबाग गाव उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचीही भीती मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
मंत्र्यांनी जाणून घेतल्या व्यथा
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवबाग गावात प्रत्यक्ष पाहणी करताना मोबारवाडी, ख्रिश्चनवाडी तसेच खाडीलगत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बंधाऱयांचीही पाहणी करीत ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. माजी सरपंच सदानंद तांडेल आणि ख्रिश्चनवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी धूपप्रतिबंधक बंधाऱयाची उभारणी कुचकामी ठरत कोटय़वधी रुपयांच्या निधीचा अपव्यय झाल्याची तक्रार केली. बंधाऱयांची उभारणी योग्यप्रकारे झाली नसल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. मंत्र्यांनी प्रत्यक्षात एक तास देवबाग गावातील समस्यांची माहिती जाणून घेत ग्रामस्थांना धीर दिला.
पाण्यासाठी ताफा अडविण्याचा प्रयत्न
गेले आठ दिवस देवबाग गावामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भीषण असतानाही त्या ठिकाणी एकही मंत्री जनतेची गाऱहाणी एकण्यासाठी पोहोचला नव्हता. त्यामुळे एका नाराज ग्रामस्थाने थेट पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे करीत मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यासाठी कळशी, हंडा त्याने थेट मुख्य रस्त्यावर आणून ठेवला. याची कल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि काँग्रेस पदाधिकारी यांना येताच त्यांनी तात्काळ रस्त्यावरील पाण्याची भांडी हटविली. त्याला बाजूला घेत मंत्र्यांच्या ताफ्याला वाट मोकळी करून दिली. मात्र यानिमित्ताने संबंधित ग्रामस्थाने गेले आठ दिवस वीज आणि पाण्यासाठी होत असलेली ग्रामस्थांची तळमळ बोलून दाखविली.
नवविवाहित दाम्पत्याने घेतले आशीर्वाद
दरम्यान, मंत्र्यांचा ताफा जात असताना एक नवविवाहित जोडपे आशीर्वाद घेण्यासाठी समोर आल्याने मंत्री वडेट्टीवार यांनी थांबून नवदांम्पत्याला आशीर्वाद दिले.









