भारतीय सैन्याचा मोठेपणा : चुकून आला होता भारतीय हद्दीत
लडाख / वृत्तसंस्था
भारतीय हद्दीत 8 जानेवारी रोजी पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाला पूर्ण चौकशीअंती पुन्हा चीनच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला पूर्व लडाखमधील पेंगाँग झीलच्या दक्षिण किनाऱयावर पकडले होते. सोमवारी या सैनिकाला चुशुल-मोल्डो चौकीवर चीनकडे सोपविण्यात आले. अंधार आणि अवघड भौगोलिक स्थितीमुळे चिनी सैनिक रस्ता भरकटला होता. त्यानंतर तो भारतीय सैन्याच्या तावडीत सापडला होता. भारतीय सैन्याने उभय देशांमध्ये झालेल्या कराराचे काटेकोर पालन करत त्याला पुन्हा चीनच्या हवाली केले आहे.
भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढलेला आहे. पूर्व लडाखमध्ये हा तणाव अधिक आहे. मात्र अशा स्थितीतही भारतीय सैन्याने दाखवलेल्या मोठेपणामुळे भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे. रस्ता चुकलेल्या चीनच्या सैनिकाला लवकरात लवकर परत पाठवावे. जेणेकरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव कमी राहील. तसेच शांतता स्थापन करण्यासाठी मदत होईल, असेही चीनने म्हटले होते. पीएमए येथे पकडण्यात आलेल्या सैनिकाला करारात ठरल्याप्रमाणे वागणूक देण्यात आली होती. तसेच त्या सैनिकाने कोणत्या परिस्थितीत एलएसी सीमा पार केली होती, याचा तपास करण्यात येत असल्याचे भारतीय सैन्याची वतीने स्पष्ट करण्यात आले होते.
यापूर्वीही भारताने याच पद्धतीने चुकून भारतीय हद्दीत आलेल्या सैनिकाची पुन्हा स्वदेशी पाठवणी केली होती. गेल्या वषी 19 ऑक्टोबरला भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानाला पकडले होते. चीनने मागील वषी केलेल्या कुरापतीनंतर एलएसीजवळ दोन्ही देशांकडून मोठे सैन्य तैनात करण्यात आलेले आहे.









