70-80 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होणे आवश्यक ः स्वामिनाथन यांचे प्रतिपादन
कोरोना विषाणूला फैलावापासून रोखण्यासाठी किमान 70 टक्के लोकसंख्येत अँटीबॉडी विकसित कराव्या लागतील, असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी काढले आहेत. परंतु हे एक अवघड काम असल्याचे त्यांनी नमूद पेले आहे.
कोविड-19 महामारीने जगाला मोठा फटका दिला आहे. अधिक लोक विषाणूने संक्रमित होतील, यातूनच समूह रोगप्रतिकारकशक्ती निर्मिती होईल, जी लोकसंख्येत एका निश्चित स्तरावरील अँटीबॉडी प्राप्त करणार असल्याची मोठी अपेक्षा होती असेही त्यांनी म्हटले आहे.
70-80 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज नसतील, तोपर्यंत विषाणू एकमेकांमध्ये फैलावत राहणार आहे. या विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारशक्ती 8 महिन्यांपर्यंत राहत असल्याचे वर्तमान वैद्यकीय अध्ययनात म्हटले गेले आहे. तर लसीमुळे इम्युनिटी कित्येक वर्षांपर्यंत राहत असल्याचा दावा काही कंपन्यांनी केला आहे. हे शक्य असले तरीही लोकांना बूस्टर डोसची गरज आहे की नाही हे पाहावे लागणार असल्याचे स्वामिनाथन म्हणाल्या.

सातत्याने संशोधन
जग रोगप्रतिकारकक्षमतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा नवा संकरावतार समोर येणे चिंताजनक आहे. हा जुन्या विषाणूपेक्षाही अधिक घातक आहे. विषाणू काय करतोय यावर देखरेख ठेवावी लागणार आहे. तो या अँटीबॉडीजपासून दूर पळणे शिकत आहे का हे ही पाहत रहावे लागणार आहे. याचमुळे लसीच्या दुसऱया पिढीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. विविध प्रोटीन्सला लक्ष्य करणाऱया लसींवर सध्या काम सुरू असल्याची माहिती डॉ. सौम्या यांनी दिली आहे.
लसीकरणाची तयारी
भारतासह जगभरात लसीकरणाची तयारी सुरू आहे. भारत 16 जानेवारीपासून नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेत आहे. सुमारे 41 देशांमध्ये 2.4 कोटींहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील बहुतांश लोक अमेरिका, चीन, युरोप आणि मध्यपूर्वेतील आहेत.
विकसित देशातच विरोध
लसीकरणाला विरोध करणारे काही लोक निश्चितच असतील. विकसनशील देशांच्या बहुतांश भागांमध्ये लोकांची लसीसंबंधी सकारात्मक भूमिका आहे. तर अधिक उत्पन्नगटातील देशांमध्ये लसीला विरोध दिसून येत आहे. विकसित देशांनी कधीच अशा प्रकारच्या साथीचा तसेच लसीकरणाचा सामना केलेला नाही हे यामागील कारण असल्याचे स्वामिनाथन यांनी सांगितले आहे.
गरीब देशांमध्येही लसीकरण
संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य यंत्रणा कोरोना लसीकरणाचा चालू महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारीत जगातील काही गरीब देशांमध्ये प्रारंभ करू शकते. सर्व देशांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी जागतिक समुदायाने अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन डब्ल्यूएचओच्या महासंचालकांचे सल्लागार डॉ. ब्रूस आयलवर्ड यांनी केले आहे.









