पुणे / प्रतिनिधी :
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा दिग्गजांच्या विचारांमधून काँग्रेस भवनाची ही पवित्र वास्तू बनली आहे. या वास्तूत तोडाफोडीसारख्या घटना होणे, हे काँग्रेस पक्षाच्या परंपरेला शोभेणारे नाही, असे मत अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी येथे व्यक्त केले.
राज्यात मंत्रिपद मिळाल्याने विश्वजीत कदम यांचा काँग्रेस भवनात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशी आदी उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले, राज्यात पक्षविस्तारासाठी केलेल्या कामामुळेच मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, याचा निर्णय पक्ष नेतृत्त्वाचा आहे. मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी प्रदेश आणि केंद्रीय स्तरावर कोणतेही शिष्टमंडळ गेले नव्हते. पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत केलेल्या कामाची पावती म्हणून मला मंत्रिपद देण्यात आले आहे. आता मी शेतकरी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
देशात हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. जबरदस्तीने कायदे लादले जात आहेत. अशा कायद्यांमुळे स्वातंत्र्यावर गदा येणार असेल आणि लोकशाहीत संविधानाला नख लागणार असेल, तर त्याला विरोध करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.









