मागच्याच आठवडय़ात सर्व भारतीयांनी नवरात्रोत्सव साजरा केला. आश्विन महिन्यात साजरा केला जाणारा हा सण आपल्याला दुर्गामातेच्या वीरतेची आठवण करून देतो आणि आपल्या आयुष्यातील राक्षसांवर मात करायचे बळही देतो. दुर्गा माता ही अथांग शक्तीचे प्रतीक आहे आणि तिच्या अष्टभुजानी ती तिच्या भक्तांचे रक्षण करते. खरंतर विष्णुंनी तिचे निर्माण हे जगात नैतिकता आणि प्रामाणिकपणा जपण्याकरताच केला होता आणि जो कोणी त्या नियमांच्या विरुद्ध जाईल त्याला संपविण्याची परवानगी दिली होती. स्त्री दुर्बल नसून, महाशक्तीशाली आणि अभेद्य असते याची प्रतिनिधी म्हणजे माँ दुर्गा आहे.
प्राचीन हिंदू संस्कृतीमध्ये जरी स्त्री ही मातेसमान आणि सद्गुणांचा धनसंग्रह मानली गेली असली, तरी सध्याचा काळात त्या श्रद्धेचा विसर पडताना आपल्याला उघडपणे दिसत आहे. आजच्या काळात स्त्री ही आदिमायेचे आणि प्रकृतीचे रूप नसून माणसाच्या राक्षसी कल्पनेचे आणि शारीरिक वासनापूर्तीचे साधन बनून राहिली आहे. स्त्री हे एका हाडामासाचे, मन आणि इच्छा असलेले एक स्वतंत्र आयुष्य आहे हे लोकांना समजणे तर लांबच, स्वीकारदेखील होत नाही. त्यामुळे स्त्रियांवर होणाऱया भीषण अमानुष्य अत्याचारांबद्दल आपण रोज 2-3 बातम्या तरी वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये पहातच असतो. निसर्गाच्या या पवित्र निर्मितीचे असे शोषण होताना पाहून मानवजातीची कीव येते. काही दिवसांपूर्वीचीच घटना, 27 तारखेला फरिदाबाद मध्ये एका 21 वषीय तरुणीचा भर रस्त्यात खून झाला. का? तर तिने एका परधर्मीय मुलाच्या प्रेमाचा आणि धर्मांतराचा प्रस्ताव नाकारला. माणूस हा त्याच्या धर्मामुळे चांगला किंवा वाईट ठरत नाही. धर्म केवळ एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. माणसाची वृत्ती ही त्याच्या विचारांमधून आणि अहंकारामधून पारखली पाहिजे. केवळ 21 वर्षांची ती मुलगी, तिच्या किती इच्छा, आकांक्षा, एका बंदुकीच्या गोळीने खोडल्या गेल्या, फक्त तिने ठामपणे तिचे मत व्यक्त केले म्हणून!
समाजात जात बघून नव्हे, तर माणूस म्हणून प्रत्येकाला आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी मान मिळाला पाहिजे. समाजात एक स्त्री जेवढय़ा मानसिक आणि शारीरिक वेदना सहन करते, त्याची कल्पनादेखील पुरुष करू शकणार नाहीत. लहानपणी जर मुलीचा रंग गोरा नसला तर टोमणे, खूप देखणी असेल तर बाहेर जायला निर्बंध! समाजाचा असाही समज असतो की स्त्री ही फक्त पुरुषांना मोहित करायला नवनवीन कपडे व दागिने घालते. एकाद्या स्त्रीचे या जगात तसेही पुरुषाला समाधानी ठेवायचे सोडून अजून काय काम आहे? या सगळय़ा वेदना या समाजाला वेदना वाटत नाहीत, इथेच सर्व समस्यांचे मूळ आहे.
याच विषयावर आवाज उठवायला आणि लोकांना परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून द्यायला भारतीय चित्रपटसृष्टीने काही चित्रपट बनवले आहेत. बॉलीवूडने 2020 मध्ये ‘छपाक’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला ज्याला खूप संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. छपाक हा सिनेमा लक्ष्मी अगरवाल नावाच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. लक्ष्मी अगरवालवर वयाच्या 16 व्या वषी एका 30 वषीय नदीमखानने ऍसिड फेकून तिचा चेहरा जाळला होता. कारण काय तर तिने त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला होता. चित्रपटात लक्ष्मीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने साकारली आहे. ज्याकरिता तिला प्रचंड प्रशंसादेखील मिळाली. ऍसिडने भाजलेल्या चेहऱयामुळे खचून न जाता स्वतःचा आत्मविश्वास भक्कम करून लक्ष्मी पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करते आणि जगाच्या रुढीबद्ध सौंदर्याच्या व्याख्या आपल्या कार्याने पुसून काढते. पण या चित्रपटावर काही प्रमाणात टीकादेखील झाली होती कारण त्यांनी लक्ष्मीच्या वास्तविक जीवनात घडलेल्या काही घटना जसे की त्या हल्लेखोराचा धर्म बदलला होता आणि त्याला मार्केटिंग रणनीतीचे कारण देऊन दुर्लक्ष केले होते.
मेघना गुलझारने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडून अशा कितीतरी मुलींना आपली दु:खद कथा सांगायला एक व्यासपीठ दिले तर मग अर्धसत्य का सांगायचे? या राक्षसांचे खरे रूप जोपर्यंत जगासमोर येत नाही, तोपर्यंत त्यांना हे असले क्रूर गुन्हे करायची भीती वाटणार नाही. ‘पुरुष जात आहे, ती अशीच वागणार.’ हे जोपर्यंत खोडले जात नाही, तोपर्यंत या जगात आपल्या मुली माणूस म्हणून बघितल्या जाणे अशक्मयच आहे. कोणताही मनुष्य पापी विचार घेऊन जन्माला येत नाही. त्याला जे शिकवले जाते, तसाच तो विकसित होत जातो. त्यामुळे ही शिकवण आपण नुसती पुरुषांना नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीला दिली पाहिजे ज्याच्या मते स्त्रियांवर होणाऱया अत्याचारांमध्ये स्त्रियांचीच चूक असते. कोण कुठले वस्त्र घालते, तिच्या त्वचेचा रंग कोणता यापेक्षा जास्ती महत्त्वाचे आहे की एखाद्या माणसाचा दुसऱयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे हे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाला तारुण्यात होणाऱया शारीरिक व मानसिक बदलांची माहिती खूप उघड आणि स्पष्टपणे दिली पाहिजे. लैंगिक वासना काय असते, मुलींची पाळी येणे म्हणजे काय, ही सर्व माहिती पालकांनी व शिक्षकांनी सर्व मुला-मुलींना खूप पूर्वीपासून दिली पाहिजे. त्यासोबत मुलगा आणि मुलगी हे जैविकदृष्टय़ा जरी विभिन्न असले तरी भावना आणि वेदना सगळय़ांना सारख्याच अनुभवायला मिळतात याची जाण करून देणेदेखील गरजेचे
आहे.
चित्रपटांमध्ये जसे ‘छपाक’ सारखे चित्रपट आहेत तसेच अश्लील चित्रपटही आहेत जे एका स्त्रीला मूलभूत मानदेखील देत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे चित्रपट समाजात अधिक चालतात. निर्माते असे चित्रपट का बनवतात हा मुद्दा पूर्णतः वेगळा आहे पण चित्रपट हे माणसाच्या करमणुकीसाठी बनवले जातात आणि अशा अश्लील चित्रपटच समाजात चालतात हे पाहून समाजाच्या मानसिकतेबद्दल बरेच काही लक्षात येते. त्यामुळे, मुलगी कोण होती, तिने कोणते कपडे घातले होते, ती संध्याकाळनंतर बाहेर का फिरत होती हे सगळे प्रश्न डोक्मयात आणायच्या आधी, त्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्हय़ाची सर्वात कठोर शिक्षा देऊन, मुलींना आश्वासन दिले पाहिजे की मुलीदेखील माणूस आहेत. समाज जर स्त्रियांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तर कुठल्याही राक्षसाच्या मनात तिच्याकडे वाईट नजरेने बघायची इच्छादेखील होणार नाही. जेव्हा ते होईल, तेव्हा खरा नवरात्रोत्सव साजरा होईल!
श्राव्या माधव कुलकर्णी








