महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला पुढील कथा सांगतात-
राया कोणे एके समयीं । निजमंचकीं शेषशायी ।
उपविष्ट असतां सेवाविषयीं । तनुमनें तन्मय तन्वंगी ।
भीष्मकरायाची नंदिनी । हरिपदनिरता अनन्यपणीं ।
त्रैलोक्मयजनक चक्रपाणि । स्वकान्त लक्षूनि सेवीतसे।
शतानुशता सद्गुणराशि । सेवनीं सादर असतां दासी ।
तथापि रुक्मिणी उपचारेंसीं । सखीजनेंसीं ओळंगे ।
व्यजनहस्ते वीजी मंद । व्यंकटापाङ्गें श्रीमुकुन्द ।
पाहोनि मानी परमानंद । हृदयपद्मी पद्माक्षी ।
जगद्?गुरु श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणीदेवींच्या पलंगावर आरामात बसले होते. भीष्मकनंदिनी रुक्मिणी आपल्या सख्यांसह पतीची पंख्याने वारा घालून सेवा करीत होती.
जगद्गुरु जो चक्रपाणि । म्हणाल किमर्थ द्वारकाभुवनीं। अवतरोनियां मनुष्यपणीं। लीलाचरणीं अनुकरे। तरी ते ऐका शुकवैखरी। सूत्रप्राय सूचना करी। झणें कुरुवर संशय धरी। म्हणोनि परिहरी शंकेतें। व्यंकटापाङ्गें सीतापाङ्गीं। जगद्गुरुत्व कान्ताआंगीं। पूर्ण ऐश्वर्य अंतरंगीं। स्मरोनि भोगी स्वानंदा। म्हणे जो निर्गुण कैवल्यधाम। पूर्ण ऐश्वर्यें पुरुषोत्तम। तोचि हा सगुण मेघश्याम। अज अव्यय यदुवंशीं। ऐशिया अनेक अवतारलीला। करूनि प्रकटी गुणगणमाळा। अनंतब्रह्माण्डाचिया खेळा। सृजी पाळि संहारी। तोचि हा ईश्वर मम प्रियतम। स्वप्रणीत जो निगमक्रम। स्वसेतुसंरक्षणसकाम। नरवरवर्ष्म अवगोनी। ऐशिया कान्ताचा एकान्त। लाहोनि धन्य मी त्रिजगांत। मानूनि भैष्मी आनंदभरित। सादर स्वकान्त उपासी। जिये मंदिरिं मंचकारूढ। स्वभक्ता प्रकट अभक्ता गूढ। तिये मंदिरिंचा सुरवाड । रचना अपाड त्वष्टय़ाची ।
जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती, पालन आणि प्रलय करतात, तेच अजन्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. रुक्मिणीदेवीचे अंत:पुर अतिशय सुंदर होते. त्यामध्ये मोत्यांच्या लडय़ा लावलेले छत होते, रत्नांचे दिवे झगमगत होते. जाईच्या माळा लावलेल्या होत्या. भ्रमरांचे थवे त्या फुलांवर गुंजारव करीत होते. झरोक्मयांच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत होती. राजा! उपवनातीन पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीच्यात वारा वाहात होता. झरोक्मयांच्या जाळय़ांतून धुपाचा धूर बाहेर जात होता. अशा महालात दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र बिछाना घातलेल्या पलंगावर मोठय़ा आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्मयाच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती. रत्नाची दांडी असलेली चवरी सखीच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने वारा घालीत ती भगवंतांची सेवा करू लागली. तिच्या अंगठी व बांगडय़ा असलेल्या हातात चवरी शोभत होती. पायांत रत्नजडीत पैंजणे रुणझुण करीत होती. पदराच्या आड लपलेल्या स्तनांच्या केशराच्या लालीमुळे गळय़ातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता आणि कमरेवर बहुमूल्य कमरपट्टा चमकत होता. अशी ती भगवंतांच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत होती. तिच्या मुखचंद्रावरून हास्यरूप चांदण्यांचा अमृतवर्षाव होत होता. ती साक्षात एकनि÷ लक्ष्मीच होती. यावेळी तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे मनुष्यरूप धारण केले होते.
Ad. देवदत्त परुळेकर









