संजू परब यांची अतुल बंगे यांच्यावर टीका
वार्ताहर / सावंतवाडी:
मुख्यमंत्री होण्यापूर्वी शेतकऱयांच्या बांधावर जात आश्वासनांची गाजरे पेलणारे नेते शेतकऱयांना वाऱयावर सोडून रात्री अपरात्री कुठे जाताहेत हे जनतेला दिसून येत आहे. अतुल बंगे हे सुशांत सिंग प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करून नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अतुल काळसेकर यांच्यावर टीका करीत आहेत. पण याचा काही उपयोग होणार नाही. काळसेकर हे सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत. आम्ही जर आम्ही तोंड उघडले तर अतुल बंगेचे मात्र वस्त्रहरण होईल, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असे भाजपचे प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी अतुल बंगे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे
काळसेकर यांच्या पक्षातील स्थानाबद्दल व कर्तृत्वाबद्दल बंगे यांनी बोलणे हाच एक मोठा विनोद आहे. कितीतरी अन्य पक्षांच्या नेत्यांना व पदाधिकाऱयांना काळसेकर यांनी आपल्या कार्यकाळात पक्षात घेतले, त्यांना सन्मानाचे स्थान दिले. दलालीसाठी पक्ष वापरणाऱयांना काळसेकर कसे समजतील, अशी आमची अपेक्षाही नाही.
काळसेकर यांनी तिकीट विकल्याचा आरोप करणाऱया बंगे यांनी आधी भाजपची कार्यपद्धती काय आहे, ते समजून घ्यावे. कावीळ झालेल्या माणसाप्रमाणे त्यांना सगळे जगच पिवळे दिसू लागले आहे. भाजपची तिकिटे काळसेकर वाटत नसून त्याचा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेत असते. त्या समितीने सारासार विचार करून घेतलेला निर्णय किती योग्य होता, हे आज दिसते आहे. राजन तेली यांच्यासारखे कुशल नेतृत्व आज पक्षाला तिथूनच मिळालेले आहे. त्यानंतर अतुल काळसेकर यांनी जिल्हा बँकेवर निवडून जात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे तुमच्यासारखी कोणाची सुपारी घेऊन बोलण्याची काळसेकर यांना गरजच नाही. सत्य व वास्तव बोलणे त्यांना परवडते. त्यांच्या पक्षातील स्थान व कर्तृत्वाबद्दल बंगे यांनी बोलणे हाच एक मोठा विनोद आहे, असेही परब म्हणाले.









